आठवडी बाजार सुसाट; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:00 AM2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:37+5:30
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे छोट्या व्यावसायिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा वेग कमी झाला असून हा विषाणूजन्य आजार आता नियंत्रणात असल्याने पुन्हा जिल्हा अनलॉक केला आहे. यामुळे आठवडी बाजारही आता सुरू झालेले आहे. मात्र, अनलॉक होताच वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी भाजी बाजारात पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आल्याने सर्वच स्तरावर व्यवहार पुन्हा सुरळीत झाले असून, बाजारपेठांसह आठवडी बाजारही अनलॉक झाले आहे. मात्र, येथील शुक्रवारी, इतवारा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे छोट्या व्यावसायिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा वेग कमी झाला असून हा विषाणूजन्य आजार आता नियंत्रणात असल्याने पुन्हा जिल्हा अनलॉक केला आहे. यामुळे आठवडी बाजारही आता सुरू झालेले आहे. मात्र, अनलॉक होताच वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी भाजी बाजारात पहावयास मिळत आहे. नागरिकांकडूनदेखील नियमांना हरताळ फासला जात आहे. विक्रेतेही मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. शारीरिक डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवार बाजारात होते.
शुक्रवार बाजारात विनामास्क वावर
येथील शुक्रवार आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांचा विनामास्क वावर आहे. मासे, भाजीविक्रेते जरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत असले तरी कोरोनाचा धोका मात्र वाढला आहे. नागरिक बिनधास्त विनामास्क वावरताना दिसून येत असून गर्दी वाढत आहे. ही बाब भविष्यात कोराना संसर्गवाढीस कारणीभूत ठरणारी आहे.
इतवारा बाजारात नियमांचा धुव्वा
लांब विश्रांतीनंतर पुन्हा आठवडी बाजार सुरू झाला असून, येथील इतवारा बाजारात अजूनही काही विक्रेते विनामास्क भाजीपाला विक्री करताना दिसून येत आहे. भाजी बाजारात मोजकेच नागरिक भाजीपाला घेताना मास्क वापरताना दिसून येत आहे. कोरोना नियमांचा धुव्वा उडाल्याचे चित्र दिसून आले.
बडनेरा येथील आठवडी बाजारात कोरोना नाही
बडनेरा नवीवस्तीच्या नेताजी चौक, पिलावन चाळसमाेर आणि झिरी मार्गालगत आठवडी बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तूसह अन्य साहित्यांची विक्री होते. मात्र, बाजारात नागरिक विनामास्क जात असून भाजी विक्रेत्यांकडूनही कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर नियंत्रण न आणल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे वास्तव आहे.
संचारबंदी निर्बंध शिथील करण्याच्या नव्या आदेशात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली नाही. तरीही आठवडी बाजार भरत असतील तर ते रोखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. गर्दी होऊ नये, खबरदारी निश्चित केली आहे.
- नितीन व्यवहारे,
निवासी उपजिल्हाधिकारी