भारनियमन,वाढीव बिलांचा मन:स्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:12 PM2017-10-08T23:12:17+5:302017-10-08T23:12:44+5:30
शहराच्या जुनीवस्ती भागात बहुतांश वीजग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढीव बिले देण्यात आलीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : शहराच्या जुनीवस्ती भागात बहुतांश वीजग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढीव बिले देण्यात आलीत. दरम्यान भारनियमनासह वाढीव बिलांच्या मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आधीच पाच तासाचे भारनियमन सुरू असून यात वाढीव बिलांची भर पडली आहे. सप्टेंबर महिन्यात वीज ग्राहकांना बिलांवरील रकम पाहून ग्राहक चक्रावून गेले आहेत. तब्बल तीन हजारांपर्यंतच्या युनिटचे बिले काही ग्राहकांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. काहींना तर ५० हजार रुपयांपर्यंत बिल ग्राहकांना मिळाले आहे. ज्यांना ५०० ते १००० रुपयांपर्यंतचे बिले यायची, त्यांना ५ ते १० हजार याहीपेक्षा अधिक रकमेची बिले आलीत.
मीटरचे रीडिंग घेणे, बिल तयार करणे व ग्राहकांना बिले पोहोचते करणे असे एकूण काम खासगी एजंसीला सप्टेंबर महिन्यात सोपविण्यात आले आहे. जुनीवस्तीसाठी ही स्वतंत्र एजंसी नेमण्यात आली आहे.
नवीन एजंसीच्या कामकाजातच ग्राहकांना प्रचंड बिले प्राप्त झाल्याची ओरड आहे. आॅगस्ट २०१७ या महिन्याचे बिले सुरळीत होते, असे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे.
वाढीव बिलांमुळे जुन्यावस्तीतील वीज ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या जुन्यावस्तीतील कार्यालयामध्ये तक्रारी सोडविण्यासाठी पायपीट करावी लागते. ग्राहकांच्या बिलांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी गुंतले आहेत. ऐन दिवाळी उत्सवादरम्यान जुनीवस्तीत ग्राहकांना वाढीव बिलांचा व भारनियमनाचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले प्राप्त झाली आहेत. ग्राहकांना मन:स्ताप देणाºया एजंसीवर वीज वितरण कंपनीने नियंत्रण ठेवावे, तसेच चुकीच्या बिलांची दुरूस्ती करून द्यावी, असे संतप्तपणे बोलले जात आहे.
हजारांच्यावर ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले
जुनीवस्तीच्या वीज वितरण कार्यालयांतर्गत वीज ग्राहकांची एकूण संख्या साडेसहा हजारांपर्यंत आहे. यात सर्वच प्रकारचे ग्राहक आहेत. यापैकी एक हजारांच्यावर ग्राहकांना मोठ्या रकमेची देयके प्राप्त झालीत. सप्टेंबर महिन्याचे बिल व त्या आधीच्या महिन्याचे बिल भरूनसुद्धा काही ग्राहकांना अधिक रकमेची देयके देण्यात आलीत. जुनीवस्तीच्या कार्यालयात ग्राहकांची देयक दुरूस्तीसाठी एकच झुंबड होत आहे.
जुन्यावस्तीतील काही वीजग्राहकांना सप्टेंबर महिन्याचे देयके अधिक रकमेचे आल्याची तक्रार आहे. यात योग्य ती दुरूस्ती केली जाईल.
- संजय श्रृंगारे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता
उपविभाग क्र. ३ (एमआयडीसी)