बाजारातून वजनकाटे गायब
By admin | Published: January 14, 2016 12:20 AM2016-01-14T00:20:40+5:302016-01-14T00:20:40+5:30
तालुक्यातील आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली असूून वजन मोजण्यासाठी दगड, बटाटे, कांदे यांचा वापर केला जात आहे.
चांदूरबाजार तालुका : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यातसुद्धा होते लुबाडणूक
सुमित हरकुट चांदूरबाजार
तालुक्यातील आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली असूून वजन मोजण्यासाठी दगड, बटाटे, कांदे यांचा वापर केला जात आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होत असतानाही वजन व मापे विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
बाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भाव केला जातो. त्याचवेळी नकळत हातसफाईने फसवणूक केली जाते, हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभर पैसे कमी झाल्याचे समाधान मिळते. मात्र, त्यातून फसगत होते हे कळत नाही. मागिल अनेक दिवसांपासून आठवडी बाजारात दांडी मारण्याचा प्रकार सुरू आहे. सर्वच आठवडी बाजारात हिच परिस्थीती आहे. तालुक्यात ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, आसेगाव ही मोठी गावे आहेत. येथे आठवडी बाजार भरतो. तालुक्याच्या बाहेरुन सुध्दा किरकोळ व्यापारी दुकान मांडण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथे ३०० ते ४०० दुकाने सुरू असतात. या दुकानदारांना वजन व मापे दर दोन वर्षातून एकदा संबंधीत विभागाकडून प्रमाणित करुन घ्यावी लागतात. मात्र, आठवडी बाजारात व्यापारी वजन व मापे नियमाप्रमाणे प्रमाणित करीत नाहीत.
संबंधित वजन व मापे विभागाकडून त्यांची कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता निर्ढावलेले आहेत. परिणामी हे दुकानदार वस्तू मोजण्यासाठी खुलेआम दगड, बटाटे, कांदे यांचा वापर करताना दिसून येतात. अनेक किरकोळ व्यापारी मागिल अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही कमी होते. त्याच वजन व मापांनी वस्तू मोजून ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिल्यास त्या वस्तूचे वजन अनेकदा किलापेक्षा कमीच असते. त्यातच आठवडी बाजारातील काही विक्रेते ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत असतात. त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन तर सोडाच दुसरे पर्यायी वजन किंवा माप नसते. वस्तू मोजताना ते प्रचंड हाथसफाई करतात. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लाऊनही हाथसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो त्या बाजुला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकांच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही हे बघताच तराजुची दांडी वरील बाजुला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो. आठवडी बाजारातील विक्रेते अशा अनेक क्लृप्त्या वापरून वजनात हेराफेरी करतात.
अलिकडे तर बाजारात डुप्लिकेट वजन-मापेही दिसून येतात. वजनावर एक किलो असे लिहिलेले असते. प्रत्यक्षात त्यचे वजन ८०० ग्रॅमच असते. बरेचदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक प्रमुख कारण असते. तेव्हा वजनमापे निरीक्षकांनी वजनकाट्यांची तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.