देवी रुख्मिणीच्या पालखीचे जंगी स्वागत
By admin | Published: June 12, 2016 12:02 AM2016-06-12T00:02:26+5:302016-06-12T00:02:26+5:30
विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुख्मिणीच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात शानदार स्वागत करण्यात आले.
अमरावतीत शासकीय महापूजा : 'आ.यशोमती ठाकूर मित्र मंडळा'चे आयोजन
अमरावती : विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुख्मिणीच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात शानदार स्वागत करण्यात आले. शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या स्वागत सोहळ्याचे आयोजन आ.यशोमती ठाकूर मित्र मंडळाने केले होते.
विदर्भातील सर्वात प्राचीन व ४२२ वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखीचे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून ८ जून रोजी प्रस्थान झाले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही दिंडी शहरात दाखल झाली. ८ ते १९ जूनदरम्यान होणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ दिंडी सोहळ्यात संपूर्ण विदर्भातून भाविक सहभागी होतात. हभप मंगेश महाराज जगताप आणि श्री संत बगाजी महाराज संस्थान या पायी दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास ही पायदळ दिंडी पालखी परसोडा मार्गे शहरातील बियाणी चौकात आली. टाळमृदंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष करीत भाविकांनी पालखीचे स्वागत केले. भव्य आतषबाजी, भजने व टाळमृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्यातील भाविकांचे स्वागत करण्यात आले. या पालखीचे पूजन व महाआरती जगद्गुरू रामराजेश्वर माऊली यांच्या हस्ते करण्यात आल्यावर महाआरतीला प्रारंभ झाला. शासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी यांनी सपत्नीक पूजन केले. या महाआरतीमध्ये माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, एसडीओ प्रवीण ठाकरे, विलास इंगोले, बाजार समिती सभापती सुनील वऱ्हाडे, पक्षनेता बबलू शेखावत, किशोर चांगोले, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, शिवाजी जगताप यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याचा सहभाग होता. या पालखीने राजापेठकडे प्रस्थान केले. तेथे युवा स्वाभिमानीच्यावतीने आ.रवी राणा यांनी स्वागत केले. शनिवारी एकवीरा देवी मंदिरात पालखीचा मुक्काम आहे. या दिंडीच्या आयोजन समितीत वैभव वानखडे, रितेश पांडव, अभिजित बोके, पंकज देशमुख, अनिकेत देशमुख, अंकुश डहाके, विशाल देशमुख, सागर देशमुख, सागर खांडेकर, योगंद्र बोके, वैभव देशमुख, रोहित देशमुख आहे. दिंडीच्या स्वागत कार्यक्रमाचे संचालन ज्योती तोटेवार यांनी केले.
पंढरपुरात देवी रुख्मिणीच्या पालखीला विशेष मान
श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यभरातून हजारो पालख्या आषाढी उत्सवाला उपस्थित असतात. परंतु विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील या पालखीला विशेष मान दिला जातो. ही विदर्भावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
फेट्यांचे आकर्षण
पायी दिंडीच्या स्वागतासाठी आ.यशोमती ठाकूर मित्र मंडळातर्फे भाविकांना फेटे बांधण्यात आले होते. अनेकांच्या डोक्यावरील फेटे हे विशेष आकर्षण ठरले होते. यामध्ये पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्यासह अधिकारी व पदाधिकारीाही फेटा बांंधून उपस्थित होते.
पोलिसांचा विशेष बंदोबस्त
पायदळ दिंडीत शेकडो भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी विशेष बंदोबस्त लावला होता. सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम व पोलीस पथक तैनात होते.
विदर्भातील सर्वात प्राचीन असलेल्या माता रुख्मिणीच्या पालखीला पंढरपूर येथे मागील वर्षीपासून विशेष मान दिला जातो. ही वैदर्भीयांसाठी गौरवाची बाब आहे. या दिंडी स्वागत सोहळ्यात हजारो अमरावतीकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा मतदारसंघ