विहीर अधिग्रहण मालकांना पाण्यासाठी आता ज्यादा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:51 PM2018-12-02T21:51:39+5:302018-12-02T21:52:25+5:30
टंचाई काळात विहीर अथवा अन्य जलाशयांतूून पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खासगी मालकांना आता ज्यादा दर देण्यात येणार आहेत. अधिग्रहित जलसाठ्याकरिता खासगी मालकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात १५० ते २०० रुपये वाढ करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टंचाई काळात विहीर अथवा अन्य जलाशयांतूून पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खासगी मालकांना आता ज्यादा दर देण्यात येणार आहेत. अधिग्रहित जलसाठ्याकरिता खासगी मालकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात १५० ते २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. ज्या विहिरींवर विद्युत पंप आणि डिझेलपंप नसेल तर त्यासाठी ४५० रुपये व सुविधा असेल तर ६०० रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने आदेश जारी केला आहे.
यंदा राज्यात वरूणराज्याने काहीशी वक्रदृष्टी केल्यामुळे पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु, टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतच नसेल तर अशा वेळी खासगी विहिरी अधिग्रहित करून त्यातील पाणी ग्रामस्थांना दिले जाते. यासाठी शासनाने यापूर्वीच कायदा करून घेतला असून, प्रसंगी त्याचा वापर केला जातो. खासगी मालकांना विहीर अधिग्रहित करून त्यातील पाणी वापरण्याच्या मोबदल्यात पैसेही अदा करण्याची तरतूद या कायद्यात आहे. परंतु शासनाकडून पाण्याच्या बदल्यात अल्प मोबदला दिला जात असल्यामुळे विहीरमालक पाणी देण्यास टाळाटाळ करीत होते. आतापर्यंत खासगी विहीर अधिग्रहित केल्यानंतर विहीर मालकांनी पाणी काढण्यासाठी विद्युत डिझेलपंप, वीजजोडणी उपलब्ध करून दिली नाही तर त्या मालकाला ३०० रुपये प्रतिदिन आणि विद्युत पंप वीज जोडणीसह साधन समृद्धी तर प्रतिदिन ४०० रुपये मोबदला दिला जात होता. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव पी.आर. खोटरे यांनी काढलेल्या आदेशानुसार आता विहीर बोरवेल अधिग्रहणासाठी विहीर मालकांना प्रतिदिन ४५० रुपये (विद्युत जोडणी नसल्यास) तसेच प्रतिदिन व जोडणी असल्यास प्रतिदिन ६०० रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळेल तेथून व्यवस्था
सध्या ज्या खासगी विहिरीवर विद्युत पंप डिझेल पंपाची सोय नसेल त्याला ३०० रुपये, तर पाणी उपसा करण्यासाठी सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ४०० रुपये प्रतिदिन मोबदला दिला जातो. दुष्काळी परिस्थितीत मिळेल तेथे पाण्याची व्यवस्था करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना अधिग्रहणाचे अधिकार
पाणीटंचाई परिस्थितीमध्ये विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत विहीर अधिग्रहण केले जाऊ शकते.विहीर मालकाकडून कायदेशीर करार केला जावा, अधिग्रहण मोबदल्याची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत येण्याची प्रतीक्षा न करता संबंधितांना मोबदला प्रदान करावा, असे या आदेशात नमूद आहे.