शिकारीच्या बेतात बिबट कुत्र्यासह विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:29+5:302021-08-15T04:15:29+5:30
शिकारीच्या बेतात बिबट कुत्र्यासह विहिरीत फोटो - गणेश वासनिक सर यांच्याकडे आहे. बडनेरा : शिकार करण्याच्या झडपेत कुत्र्यासह बिबट ...
शिकारीच्या बेतात बिबट कुत्र्यासह विहिरीत
फोटो - गणेश वासनिक सर यांच्याकडे आहे.
बडनेरा : शिकार करण्याच्या झडपेत कुत्र्यासह बिबट एका शेतातील विहिरीत पडला. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. सदर घटना शनिवारी सकाळी समोर आली. याप्रसंगी बघणाऱ्यांची एकच गर्दी जमली होती.
बडनेरातील मेघे महाविद्यालयापासून थोड्याच अंतरावर पांडुरंग अंबाडकर यांचे शेत आहे. शेतात कीटकनाशक फवारणी करण्यासाठी गेलेल्या पंकज तायडे याला विहिरीतून कुत्र्याचा आवाज ऐकू आला. त्याने डोकावून पाहिले असता त्याला कुत्र्यासह बिबट्याही विहिरीत होता. त्याने लागलीच जवळपासच्या लोकांना आवाज दिला. यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. यादरम्यान बडनेरा शहरात वाऱ्यासारखी घटना पसरली तेव्हा काही वेळातच लोकांनी एकच गर्दी केली. कुत्रा व बिबट्या पाण्यात सुरक्षित राहावेत, यासाठी प्रथम लाकडाचा ठोकळा सोडण्यात आला. त्यावर दोघेही बराच वेळ सुरक्षित बसले होते. विहिरीत पिंजरा सोडताच बिबट्या त्यात जाऊन बसला. त्याला बाहेर ओढल्यानंतर कुत्र्यालाही विहिरीबाहेर काढण्यात आले. बिबट्याला वडाळी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या शुश्रूषा केंद्रात नेण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी वर्तुळ अधिकारी विनोद ढवळे, वनरक्षक अविनाश मते, नवेद अंजुम काजी, किशोर धोटे, सुभाष गवई, अमोल गावनेर,रेस्क्यू पथकातील फिरोज पठाण, किशोर माहुलकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, ओमकार भुरे यांनी नागरिकांच्या मदतीने या प्राण्यांना सुरक्षित विहिरीबाहेर काढले. बडनेराचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व इतर कर्मचारीही घटनास्थळी होते. अगदी शहरालगत बिबट्या आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंडेश्वरपासून थोड्याच अंतरावर चिरोडी जंगल आहे. गेल्या दोन वर्षात एक्सप्रेस हायवेलगतच्या शेतांमध्ये वडद परिसरात बिबटे दृष्टीस पडत आहेत.
---------------------------------