पंचमढीला गेले अन् घर साफ झाले; सव्वासहा लाखांचा ऐवज लंपास, श्वानपथक पाचारण
By प्रदीप भाकरे | Published: June 22, 2023 03:57 PM2023-06-22T15:57:11+5:302023-06-22T15:57:22+5:30
याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी २१ जून रोजी रात्री अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.
अमरावती: मित्रांसह सहकुटूंब पंचमढीला गेलेल्या एका स्थानिकाच्या घरावर चोराने हात साफ केला. तेथून ८५ हजार रोख रकमेसह तब्बल ६ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. २१ जून रोजी दुपारी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. रहाटगाव स्थित स्वामी समर्थ मंदिरामागील ओम साई विहार येथील प्रवीण इखार यांच्या घरी ती चोरी झाली.
याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी २१ जून रोजी रात्री अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्तांसह नांदगावचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी ठसेतज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. इखार हे दोन मित्र व कुटुंबियासह १९ जून रोजी पंचमढीला गेले होते. २१ जून रोजी दुपारी परत आले असता मुख्य दाराचा कुलूप कोंडा तुटलेला दिसून आला.
आत जाऊन पाहिले असता दिवाणमध्ये ठेवलेले मंगळसूत्र, नेकलेस, गोफ, कानातील जोड, अंगठ्या असे ५ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरीला गेल्याचे लक्षात आले. ड्रावरमध्ये ठेवलेली ८५ हजार रुपये रोख देखील आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने या घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना दिली.