पश्चिम विदर्भ : एक लाख १० हजार शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:50 AM2020-01-09T11:50:38+5:302020-01-09T11:51:11+5:30
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एकापेक्षा अधिक कर्जखात्यात थकबाकी दोन लाखांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्जमाफी योजनेसाठी सोसायटी व बँकांमध्ये युद्धस्तर काम सुरू आहे. यात विभागातील विविध बँकांचे किमान सहा लाख ६० हजार ४५३ शेतकऱ्यांना ४५४३ कोटी ५९ लाख ९ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. अद्याप एक लाख १० हजार १० शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नावांची यादी गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अंतिम यादीत लाभार्थीच्या संख्येत २ ते ३ टक्के वाढ होऊ शकते, असे सहकार सूत्रांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एकापेक्षा अधिक कर्जखात्यात थकबाकी दोन लाखांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कालबद्ध कार्यक्रमात प्रथम निकषानुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली व यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नाही, अशा शेतकऱ्यांची यादी स्थानिक ग्रामपंचायत, बँक शाखेच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना संबंधित बँकांच्या शाखेत जाऊन आधार नोंदणी करावी लागेल. त्यानंतर बँकांद्वारा शेतकऱ्यांची १ ते २८ कॉलममध्ये माहिती ३१ जानेवारीपर्यंत भरण्यात येणार आहे.
सहकार विभागाच्या माहितीनुसार १५ फेब्रुवारीपर्यंत पात्र लाभार्थींची माहिती शासन जाहीर करणाऱ्या पोर्टलमध्ये बँकाद्वारा भरण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना विशीष्ठ क्रमांक देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा पोर्टलवर स्वत:ची बायोमेट्रिक ओळख पटवून कर्जमाफीच्या रक्कमेसाठी संमती नोंदवावी लागणार आहे. समंती नसल्यास त्यांना आॅनलाईन तक्रार करता येणार आहे. याची शहानिशा जिल्हाधिकारी अध्यक्ष व डीडीआर सचिव असलेली समिती करेल व त्यानंतरच संबंधित शेतकºयांचे बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
कर्जमाफी योजनेत पश्चिम विदर्भाची स्थिती (लाखात/७ जानेवारी)
जिल्हा शेतकरी संख्या रक्कम आधार बाकी
अमरावती १०८२८९ ८४५७५.०० २३०८१
अकोला ११३५८० ७७५६३.४५ १४६३२
यवतमाळ १२८१०८ ७७२५२.६३ २१६५४
बुलडाणा २००५९५ १४०६२२.०० ३७०४३
वाशिम १०९९०१ ७९४६७.९३ १३६००
एकूण ६६०४५३ ४५४३५९.०१ ११००१०
आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी संबंधित गाव व बँक शाखेमध्ये मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. योजनेचा लाभ धेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत आधार क्रमांक देणे महत्वाचे आहे.
- संदीप जाधव,
जिल्हा उपनिबंधक, अमरावती