पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:08 AM2019-06-07T11:08:09+5:302019-06-07T11:09:20+5:30

सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.

West Vidarbha acquisition of 452 tankers, 2736 wells | पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली टँकर अन् विहीर अधिग्रहणाची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४०९ गावांमध्ये ४५२ टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. तात्पुरता उपाय म्हणून २,७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.
अमरावती विभागात पाच वर्षांचा आढावा घेतला असता, २०१४ मध्ये सरासरीच्या ८३ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७१.५ टक्के, २०१६ मध्ये १०९.०९ टक्के, २०१७ मध्ये ७६ टक्के, तर २०१८ मध्ये ८५.०४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पश्चिम विदर्भात सलग दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाईचे दुष्टचक्र सुरू आहे. जलयुक्त शिवारची ६० हजारांवर कामे या चार वर्षांत झाली. मात्र, प्रशासनात नियोजनाचा दुष्काळ असल्याने यंदा पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. शासनाच्याच आरखड्यानुसार यंदा वºहाडातील ३,७३३ गावांत भीषण पाणीटंचाई आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ यंदा अमरावती जिल्ह्यात १९८१, अकोला ५६९, यवतमाळ ७५५, बुलडाणा २१६७ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात यापैकी ३४९९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. त्यातुलनेत ४९५ उपाययोजना प्रगतीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार ३००४ उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. पूर्ण झालेल्या उपाययोजनांसाठी ५३.७३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी ७.३७ कोटी, नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी २.१९ कोटी, तात्पुरत्या पूरक नळयोजनांसाठी ३.०२ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८.६५ कोटी, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी १२.४९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

४५२ टँकरचा आजपर्यंतचा विक्रम
पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून पश्चिम विदर्भात ४५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हा आतापर्यंतचा रेकार्ड असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २६४ टँकर सध्या सुरू आहे. अमरावती ५४, अकोला ३६ यवतमाळ ४३ व वाशिम जिल्ह्यात ५५ टँकर सुरू आहे. यापूवी २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ११३ टँकर व १०७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते, तर २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ३४४ टँकर व १८४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.

२७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण
पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून विभागात सद्यस्थितीत २७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. हीदेखील विभागातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक ९८७ खासगी विहिरींचे अधिग्रहण बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. अमरावती ५६५, अकोला २७०, यवतमाळ ६६४ व वाशिम जिल्ह्यात २५० विहिरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने अधिग्रहित केलेल्या विहिरींनादेखील कोरड लागल्याने स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: West Vidarbha acquisition of 452 tankers, 2736 wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.