पश्चिम विदर्भात कपाशीपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:02+5:302021-07-25T04:12:02+5:30
अमरावती : यंदा ९ जुलैनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने खरिपाच्या पेरण्यांची गती आलेली आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत सरासरी ३२,२८,५०० हेक्टरच्या ...
अमरावती : यंदा ९ जुलैनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने खरिपाच्या पेरण्यांची गती आलेली आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत सरासरी ३२,२८,५०० हेक्टरच्या तुलनेत २९,८०,१०० हेक्टरवर पेरणी आटोपली, ही ९२ टक्केवारी आहे. यात सोयाबीनचे १३,९९,९१० हेक्टर व कपाशीची ९,७०,४०० हेक्टरमध्ये सद्यस्थितीत लागवड झालेली आहे.
विभागात मान्सून थबकल्यानंतर खरिपाच्या पेरण्याही रखडल्या होत्या. आता मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्याने पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पेरण्या सर्वाधिक माघारल्या होत्या. आता पेरण्यांची लगबग सुरू आहे. विभागीय कृषी संहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ६,६१,९०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ९०.२ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात ४,४७,२०० हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या, याची ९२.५ टक्केवारी आहे.
वाशिम जिल्ह्यात ३,८२,३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९४.१ टक्केवारी आहे. अमरावती जिल्ह्यात ६,५०,१०० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. ही ९४.४ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८,४३,००० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली, ही ९२ टक्केवारी आहे. मागच्या हंगामात याच कालावधीत ९२ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या.
बॉक्स
कपाशी, सोयाबीनचे पेरणीक्षेत्र
* सोयाबीनची सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात ३,५५,७०० हेक्टर, अकोला २,१७,६००, वाशिम २,९१,३००, अमरावती २,५१,३०० व यवतमाळ जिल्ह्यात २,८३,८०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.
* कपाशीकरिता बुलडाणा जिल्ह्यात १,८१,१०० हेक्टर, अकोला १,३२,२००, वाशिम २२,०००, अमरावती २,१९,५०० व यवतमाळ जिल्ह्यात ४,२२,५०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.