विदर्भातील आरएफओ प्रशिक्षणाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट; वन विभागात वरिष्ठांविरोधात एल्गार
By गणेश वासनिक | Published: July 14, 2023 07:01 PM2023-07-14T19:01:57+5:302023-07-14T19:02:14+5:30
आरएफओंवर असलेले आरोप, गुन्हे वा निलंबनाची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.
अमरावती: वन विभागात पदोन्नत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना (आरएफओ) प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात दोन प्रशिक्षण केंद्र देण्यात आली आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरएफओंना वन अकादमी कुंडल (सांगली) येथे तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकण विभागातील आरएफओंना वन अकादमी चंद्रपूर येथे प्रशिक्षण दिल्या जात आहे. मात्र, यावरच आरएफओंनी आक्षेप नोंदविला आहे. हेतुपुरस्सर विभाग बदलल्याने अनेकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तर अनेक जण आजारी असून महिला आरएफओंना कौटुंबिक समस्यांचा प्रशिक्षणात विचार करण्यात आला नाही, असा आक्षेप आहे.
दहा आरएफओ न्यायालयात, वरिष्ठांकडून टार्गेट
राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ४५ दिवसांचे प्रशिक्षण महसूल विभागनिहाय विदर्भातील अधिकाऱ्यांना चंद्रपूर उर्वरित महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना कुंडल (सांगली) येथे प्रशिक्षण देण्यात यावे, याकरिता विदर्भातील दहा आरएफओंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ६५०/२०२३ अन्वये धाव घेतली आहे. मात्र या आरएफओंना आता १९ वरिष्ठ अधिकारी कटू भावनेने बघत असून त्यांची कुंडली काढण्यासाठी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्र जारी केले आहे. यामध्ये आरएफओंवर असलेले आरोप, गुन्हे वा निलंबनाची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.