मोबाईलसाठी कारवाई इअरफोनबाबत काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 09:59 PM2018-11-09T21:59:20+5:302018-11-09T22:00:08+5:30
वाहन चालविताना एखादा चालक एकटाच बडबड करताना दिसतो. त्याचे जवळून निरीक्षण केल्यास, त्याच्या कानात इअरफोन असल्याचे दिसते. हा प्रकार नियमबाह्य आहे, मात्र, मोबाइल हाती घेऊन कानाला लावून बोलणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. इअरफोनवर बोलणाºयांविरुद्ध कधीच कारवाई का होत नाही, असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाहन चालविताना एखादा चालक एकटाच बडबड करताना दिसतो. त्याचे जवळून निरीक्षण केल्यास, त्याच्या कानात इअरफोन असल्याचे दिसते. हा प्रकार नियमबाह्य आहे, मात्र, मोबाइल हाती घेऊन कानाला लावून बोलणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. इअरफोनवर बोलणाऱ्यांविरुद्ध कधीच कारवाई का होत नाही, असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे.
इअरफोनवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीससुद्धा संभ्रमात पडल्याची स्थिती आहे. शहरातील वाहतुकीची अस्ताव्यस्त स्थिती पाहता, वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागते. अशा स्थितीतसुद्धा काही चालक मोबाइलवर बोलत वाहन चालवितात. हा गंभीर प्रकार जिवावर बेतू शकतो. मात्र, याकडे वाहनचालक दुर्लक्ष करतात. वाहन चालविताना चालक मोबाइलवर बोलत असल्याचे वाहतूक पोलिसांना दिसून पडले. मात्र, इअरफोनवर बोलणारे सहजासहजी दिसून पडत नाही. त्यामुळे अशा वाहनचालकांना कसे पकडावे, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. शहरातील विविध मार्गांवर काही तरुण-तरुणी इअरफोन कानात टाकून गप्पा मारत दुचाकी चालवितात. इअरफोन फोनवर बोलत-बोलत बेभान होऊन वाहन चालवितात. त्यांना बाहेरील वाहतुकीशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येते. बेभान अवस्थेत दुचाकी चालवित असताना, अन्य वाहनचालकांचा जीव टांगणीला लागतो; मात्र त्या वाहनधारकांना काहीच फरक पडत नाही.
इअरफोन कानात असताना बाहेरील वाहनांचे आवाज सहजासहजी ऐकायला येत नाही आणि अशावेळी वळण घेतानासुद्धा इअरफोनवर संवाद निरंतर सुरूच ठेवतात. हा गंभीर प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा ठरतो. मोबाईलवर बोलत असताना वाहनचालकांचे अपघात शहरात घडले आहेत. त्यामुळे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस गांभीर्य दाखवितात. मात्र, इअरफोनवर बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष का केले जाते, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
५० जणांवर कारवाई
वाहतूक शाखेचे पोलीस मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवूनच असतात. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी तब्बल ७० जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. काही जण तर पोलिसांना पाहून पळून गेले. मात्र, त्यांच्या दुचाकी क्रमांक नोंदवून घरपोच मेमोसुद्धा देण्यात आले आहे.
फोनवर बोलणाऱ्यांचे अन्य वाहतुकीवर दुर्लक्ष होते; ते नियमबाह्यच आहे. मात्र, इअरफोनवर बोलत वाहन चालवित असल्याचे त्यांना पकडल्यावर प्रूव्ह करणे कठीण आहे. याशिवाय आम्ही इअरफोनवर बोलत नसल्याचे सांगून अनेक वाहनचालक वादसुद्धा घालतात.
- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.