दुचाकीस्वारांवर कारवाई चारचाकी वाहनांचे काय ?
By admin | Published: February 16, 2016 12:19 AM2016-02-16T00:19:44+5:302016-02-16T00:19:44+5:30
बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे.
फौजदारी कारवाईला मर्यादा : वाहनचालकांचीही जबाबदारी
अमरावती : बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत केवळ दुचाकींना लक्ष्य केले जात आहे. त्या तुलनेत बेशिस्त चारचाकीचालक मात्र बिनधास्त वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत असल्याचे चित्र आहे. जामरची अत्यल्प संख्या पाहता वाहतूक शाखेनेही चारचाकी वाहनांवरील फौजदारी कारवाई सुरू असली तरी त्या कारवाईच्या मर्यादा स्पष्ट आहेत.
शहराच्या अनेक चौकांत दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहने रस्ता अडवून आणि वाहतुकीस अडथळा करून उभी राहत असताना त्यांच्यावर नाममात्र कारवाई केली जाते. अलीकडे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. हा प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र अशा कारवार्इंवर मर्यादा असते. ज्याप्रमाणात दुचाकींवर कारवाई केली जाते, त्याप्रमाणेच रस्ता अडवून ठेवणाऱ्या आणि नो-पार्किंग स्थळी चारचाकी वाहनांना ‘जामर’ लावून त्यांच्यावर कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा अनेक दुचाकीस्वारांनी व्यक्त केली आहे. नो-पार्किंग असताना तासन्तास उभी करण्यात येणारी चारचाकी वाहने अतिक्रमणात भर टाकणारी आहे. शासकीय कार्यालयालगत चारचाकी वाहनांची सर्वाधिक पार्किंग अवैधरीत्या केली जाते. (प्रतिनिधी)
चारचाकी वाहन चालकांचा त्रागा
दुचाकीस्वाराच्या तुलनेत चारचाकी वाहनचालक अधिक प्रमाणात पोलिसांशी भिडतात. प्रसंगी राजकीय पदाधिकारी वा संघटनांचा दबावसुद्धा पोलिसांवर येतो. त्यामुळे दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहनचालकांवरील कारवाईचा आकडा अल्प आहे. त्याचबरोबर जामरची संख्या अल्प असल्यानेही चारचाकीची अवैध पार्किंग केली जाते. त्यावर अंकुश राहिलेला नाही.
दुचाकींवरच बडगा
शहरात अवैध पार्किंगचा व्याप वाढल्याने वाहतूक शाखेकडून ‘नो पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. दुचाकीस्वारांवरच प्रत्येकी शे-सव्वाशे रुपयांचा बडगा उगारला जातो. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये असंतोष उफाळत आहे.
वाहनचालकांची जबाबदारी नाही का ?
बहुतांश वाहनचालक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करतात. चारचाकी वाहनचालक मोठ्या रुबाबात रस्त्यानजीक वा कधीकधी रस्त्यावर वाहन उभे करून आपल्या कामाला निघून जातात. आपल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होतो का, हे पहायला बहुतांश वाहनचालकांकडे वेळ नसतो. शासकीय कार्यालय परिसरात तर उच्चभ्रू नागरिक ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये बिनधास्तपणे वाहने पार्क करतात. वाहतूक नियंत्रणाची जेवढी जबाबदारी पोलिसांची तेवढीच महापालिकेची आणि सर्वात आधी वाहन चालकांची आहे, हे समजून घ्यायला हवे.
जिल्हाधिकारी कार्यालय चौकात चार चाकींच्या रांगा
जिल्हाधिकारी कार्यालय, एसपी कार्यालयांसह जिल्हा परिषद आणि न्यायालयाबाहेरच्या परिसरात वाहतुकीस अडथळा येईल, अशारितीने धनदांडग्यांची चारचाकी वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर पार्क केली जातात. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.
जामरची संख्या कमी असली तरी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या चार चाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. कुणालाही पाठीशी घातले जात नाही.
- बळीराम डाखोरे,
प्रभारी एसीपी, वाहतूक शाखा,
शहर आयुक्तालय