है क्या अमरावती! काळी-पिवळी, ऑटोनेही प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:56+5:30
एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची कुचंबणा रोजची सुरू आहे, तर महत्त्वाचे काम करण्यासाठीच नागरिक कोरोनाकाळाप्रमाणे बाहेर पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : राज्यभर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा मार्ग परतवाडा - अमरावती यावर दामदुप्पट रकमेत मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना जावे लागत असल्याचे चित्र मागील चार दिवसांपासून आहे.
एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे.
या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची कुचंबणा रोजची सुरू आहे, तर महत्त्वाचे काम करण्यासाठीच नागरिक कोरोनाकाळाप्रमाणे बाहेर पडत आहेत.
दामदुप्पट रकमेत मिळेल त्या वाहनाने प्रवास
परतवाडा-अमरावती व इतर मार्गांवर कालपर्यंत काळी-पिवळी व खासगी बस धावत होत्या. मात्र, एसटी बसचालक-वाहक व आगार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीनचाकी ऑटोरिक्षांनीही नागरिक प्रवास करत असल्याचे चित्र आहे. परतवाडा - अमरावती प्रवास भाडे शंभर रुपये घेतले जात आहेत. काळी-पिवळी कालपर्यंत चाळीस रुपये घेत असताना, आता ६० रुपये, तर खासगी बस ५० रुपयांवरून थेट ८० रुपयांवर प्रवास भाडे घेत आहेत.
बसस्थानकापुढेच रांगा
परतवाडा बसस्थानकापुढे खासगी प्रवासी वाहून नेणाऱ्या बसगाड्या, काळी-पिवळी, ऑटोरिक्षा अमरावती मार्गावर इतर ठिकाणी जाण्यासाठी लागत आहेत. दुसरीकडे परिवहन महामंडळाचे चालक-वाहक कर्मचारी संपावर असून, त्यांच्या बसगाड्या कुलूपबंद आहेत.
बाजारपेठेवरील परिणाम
नजीकच्या तीन-चार तालुक्यांसाठी परतवाडा मोठी बाजारपेठ आहे. येथे आदिवासी पाड्यासह अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी तालुक्यांमधील ग्रामीण भागातील नागरिक येतात. परंतु, बस बंद असल्याने बाजारपेठसुद्धा दिवाळीनंतर शांत दिसून आली.