हे काय? अमरावतीतही चाईल्ड पोर्नोग्राफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:00 AM2020-01-15T06:00:00+5:302020-01-15T06:00:19+5:30

केंद्रीय गृह मंत्रालयाने पॉर्न व्हिडिओ अपलोड करणाऱ्या वेबसाइटवर निर्बंध आणले, तर चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कठोर कारवाईचे धोरण निश्चित केले आहे. तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील सायबर सेलकडून अशा ग्रुपवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सायबर सेलकडील आधुनिक तंत्रज्ञानातून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

What is this Child pornography in Amravati too | हे काय? अमरावतीतही चाईल्ड पोर्नोग्राफी

हे काय? अमरावतीतही चाईल्ड पोर्नोग्राफी

googlenewsNext
ठळक मुद्देसायबरला मिळाल्या आठ ‘टिप्स लाईन’

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील काही फेसबूक पेजवरून चाईल्ड पोर्नोग्राफीसंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याची पुढे आली आहे. नवी दिल्लीतील नॅशनल क्राइम ब्यूरोमार्फत ही माहिती राज्यस्तरावरून जिल्हास्तरावरील सायबर पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील सायबर पोलिसांना चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात आठ टिप्स लाईन मिळाल्या असून, सायबर पोलिसांनी पडताळणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने पॉर्न व्हिडिओ अपलोड करणाऱ्या वेबसाइटवर निर्बंध आणले, तर चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कठोर कारवाईचे धोरण निश्चित केले आहे. तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील सायबर सेलकडून अशा ग्रुपवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सायबर सेलकडील आधुनिक तंत्रज्ञानातून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. भारतातील चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात फेसबूकने दिल्ली येथील नॅशनल क्राईम ब्यूरो (एनआरसी) यांना माहिती पुरविली होती. त्या माहितीचे वर्गीकरण करून पुढील कारवाईसाठी विविध राज्यांतील विशेष पोलीस महासंचालक कार्यालयांतील सायबर सेलकडे पाठविण्यात आली. त्यांनीही वर्गीकरण करून ती माहिती जिल्हास्तरावरील सायबर सेलकडे पाठविली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांना सात, तर शहर पोलिसांना एक अशा आठ टिप्स लाईन पाठविण्यात आल्या आहेत. यावरून अमरावती जिल्ह्यातील आठ फेसबूक पेजवरून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने सायबर पोलिसांनी पडताळणी सुरु केली आहे. पडताळणीनंतर चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाल्यास, ती अमरावती जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरेल, अशी पोलीस वर्तुळात चर्चा आहे. मुलांशी काय घडते, मुले सुरक्षित आहेत काय, याबाबत पालकांनी सजग राहण्याची नितांत गरज आहे.

बीड, पिंपरी, गोंदियात हा प्रकार उघडकीस
‘चाईल्ड पोर्नोग्राफी’वर जगभरात बंदी आहे. तरीसुद्धा बीड, पिंपरी चिंचवड, सातारा परिसरात बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संबंधित फेसबुक प्रोफाईल धारकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गोंदियात नुकताच एक असाच प्रकार उघड झाला आहे. टिकटॉकवर तीन तरुणांनी वॉशिंग पावडरच्या जाहिरातीचे गाणे शूट केले. त्यात पाच वर्षीय मुलगा नग्न दाखविला गेला. ते तरुण त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करीत होते. यासंदर्भात गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी सुमोटो कारवाई करून गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे.

व्यवसायासाठी मुलामुलींचे व्हिडीओ
‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठी ओळखूही येणार नाही अशा पद्धतीने व्हिडीओ बनविण्यात येतात. अनेक जण लहान मुलामुलींचे अश्लील व्हिडीओ क्लिक करून त्याचा व्यावसायिक वापर करतात. अनेक जण लहान मुलांचे घरातच काही वेगळ्या प्रकारचे व्हिडीओ मोबाईलमध्ये बनवितात. ते व्हिडीओ बाहेर लीक झाल्यास, त्याचाच फायदा काही जण घेतात. ते व्हिडीओ व्हायरल करतात. काही जण लहान मुलामुलींची फसवणूक करून त्यांचे व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करतात आणि ते व्हायरल करतात. काही जण सूड उगविण्याच्या उद्देशाने विरोधी गोटातील मुलांसोबत अश्लील कृत्य करून ते व्हिडीओ व्हायरल करतात. चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये ६७ (ब) कलमात १८ वर्षाखालील मुलामुलींच्या गुप्तांगाला स्पर्श करणे, त्यांच्या भावना उत्तेजित होईल असे कृत्य करणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो.

Web Title: What is this Child pornography in Amravati too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.