स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:27+5:302021-05-26T04:13:27+5:30
रक्ताचे नातेही गोठले? अंत्यसंस्कारानंतर अनेक नातेवाईक फिरकतही नाहीत अमरावती : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या गोळा केलेल्या अस्थी, राख अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक ...
रक्ताचे नातेही गोठले? अंत्यसंस्कारानंतर अनेक नातेवाईक फिरकतही नाहीत
अमरावती : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या गोळा केलेल्या अस्थी, राख अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक स्मशानातून घेऊन जातात. परंतु, असेही काही आहेत, जे स्मशानाकडे फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे शहरातील विविध हिंदू स्मशानभूमीचे अथवा महापालिका कर्मचारीच ही राख एकत्रित करून विसर्जित करतात. परंतु, सध्या नद्याही आटल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. अशावेळी कृत्रिम विसर्जनस्थळी अस्थी विसर्जित करीत असल्याची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र स्वरुपाची आहे. दिवसाकाठी ८०० ते ९०० कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे मृत्युमुखी पडणाऱ्यांचाही संख्या कमी नाही. कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींवर महापालिकेच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महिनाभरापूर्वी दरदिवशी २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. सध्या हा आकडा १५ ते १८ पर्यंत खाली आला आहे.
दरम्यान, अंत्यविधीनंतर गोळा केलेली राख घेऊन जाण्याचे सौजन्यही काही आप्त दाखवित नाहीत. स्मशानाकडे फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे राखेचे करायचे काय, असा प्रश्न कायम महापालिका, हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पावसाळ्यात नद्या प्रवाही असल्याने चार-पाच दिवसांची राख एकत्रित करून ती पात्रात सोडून दिली जात होती. परंतु, आजघडीला नद्या कोरड्या झाल्याने त्यात राख सोडणे कठीण झाले आहे. आठ ते दहा दिवसाआड एखाद्या नदीच्या पाण्यात ती सोडून दिली जात आहे. स्मशानातच एका कोपऱ्यात साठवून ठेवल्या जाणाऱ्या राखेच्या मडक्यांची संख्या पाहून कोरोनाच्या भीतीने रक्ताचे नातेही गोठले की काय, असा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही.
----------------
बॉक्स
अस्थींच्या विसर्जनाचाही प्रश्न?
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाहेर फिरण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण स्मशानातून अस्थी घेऊन जात नाहीत. त्यामुळे संबंधित अस्थींचे करायचे काय, असा प्रश्न हिंदू स्मशानभूमी, महापालिका कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
बॉक्स
सार्वजनिक स्मशानभूमी एसआरपीएफ
अमरावती शहरातील शासकीय तसेच खासगी दवाखान्यांत दगावलेल्या कोरोना रुग्णांवर एसआरपीएफ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महिनाभरापूर्वी एकेका दिवशी २० ते २५ मृतदेहांवर अंंत्यसंस्कार करण्यात येत होते. सध्या ते प्रमाण १५ ते १८ पर्यंत खाली आले आहे. जे नातेवाईक राख घेऊन जात नाही, ती स्मशानात साठवून ठेवली जात आहे. नदीचे पाणी आटल्यामुळे सध्या दहा ते बारा दिवसांची राख स्मशानात शिल्लक आहे.
बॉक्स
सार्वजनिक स्मशानभूमी, विलासनगर
शहरात कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींवर येथील विलासनगर आणि शंकरनगरातील सार्वजनिक स्मशानभूमींमध्ये महापालिकेच्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. ५० टक्के नातेवाईक राख तसेच अस्थी घेऊन जातात. परंतु, उर्वरित लोक राख नेत नाहीत. त्यामुळे ही राख स्मशानातील एका कोपऱ्यात साठवून ठेवली जाते. यानंतर ती ओढा अथवा नदीच्या पाण्यात सोडून देण्यात येते.
बॉक्स
सार्वजनिक हिंदू स्मशानभूमी
अमरावती शहरामध्ये दगावलेल्या कोरोनाबाधितांवर महापालिकेकडून सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारानंतर संबंधित नातेवाइकाना राख तसेच अस्थि घेऊन जाण्याबाबत कळविले जाते. यानंतरही काही नातेवाईक राख घेऊन जात नाहीत. अशी राख येथील हिंदू स्मशानभूमीत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जात आहे. दुसऱ्या लाटेत दगावलेल्यांची, नातेवाइकांनी न नेलेली राख स्मशानभूमीत शिल्लक आहे.
कोट
काय म्हणतात स्मशानजोगी....
अंत्यसंस्कारानंतर जे नातेवाईक राख घेऊन जात नाहीत, ती स्मशानातच साठवून ठेवली जाते. सध्या नदीला पाणी नाही. त्यामुळे राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजघडीला १०० ते १५० जणांच्या अस्थी साठल्या आहेत.
-एक कर्मचारी, हिंदू स्मशानभूमी, अमरावती
अंत्यसंस्कारानंतर नातेवाइकांना राख तसेच अस्थी घेऊन जाण्यास सांगितले जाते. अनेक जण नेत नाहीत. त्यामुळे अशी राख स्मशानातच साठवून ठेवली आहे.
- एक कर्मचारी, महापालिका
५० टक्के नातेवाईक राख घेऊन जात नाहीत. अशी राख आम्ही साठवून ठेवतो. बऱ्यापैकी साठवल्यानंतर ती कृत्रिम विसर्जनस्थळी अथवा नदीमध्ये सोडून देतो. आजघडीला पाच-सहा दिवसांची राख शिल्लक आहे.
- एक कर्मचारी, हिंदू स्मशानभूमी