‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ कागदावरच नगररचना विभाग करतो तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:29 AM2019-08-08T01:29:58+5:302019-08-08T01:30:21+5:30

भूजल पुनर्भरण व्हावे, यासाठी घराच्या बांधकामास परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य याबाबतचा नियम पूर्वीपासून असताना कागदावरच राहिला. त्यामुळे नगररचना विभाग करतो काय, असा आरोप होत आहे. केवळ भोगवटदार प्रमाणपत्रधारक नागरिकांची नोंद या विभागाकडे आहे.

What does 'Rainwater Harvesting' do on paper? | ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ कागदावरच नगररचना विभाग करतो तरी काय?

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ कागदावरच नगररचना विभाग करतो तरी काय?

Next
ठळक मुद्देचिरमिरी द्या, परवाना घ्या : एजंटांचा सुळसुळाट, नियम धाब्यावर, बांधकाम परवाना मिळतो तरी कसा?

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भूजल पुनर्भरण व्हावे, यासाठी घराच्या बांधकामास परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य याबाबतचा नियम पूर्वीपासून असताना कागदावरच राहिला. त्यामुळे नगररचना विभाग करतो काय, असा आरोप होत आहे. केवळ भोगवटदार प्रमाणपत्रधारक नागरिकांची नोंद या विभागाकडे आहे. नागरिकांना याचे गांभीर्य कळले नसल्यानेही शहराच्या भूजलात घट झाली. आता पुन्हा नागरिक जलसंधारणाकडे वळलेत, ही अलीकडच्या दोन महिन्यांतील सकारात्मक बाब आहे.
भूजल पातळीत झपाट्याने घट होणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीचा क्रमांक आहे. त्यामुळे आता केंद्राचे ‘जलशक्ती अभियान’ महापालिकेत १ जुलैपासून राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी आयुक्त संजय निपाणे यांच्या संकल्पनेतून तीन महिन्यांपूर्वी वडाळी तलावातील गाळ महाश्रमदानातून काढण्यात आला. या श्रमदानाची आता लोकचळवळ झालेली आहे. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनीदेखील या अभियानात झपाटल्यागत काम केल्याने समाजमाध्यमावर अन् प्रत्यक्षात लोकसहभागाच्या सकारात्मक प्रतिक्रिया आहेत.
यानिमित्ताने आयुक्त संजय निपाणे यांनी जबाबदारी निश्चित केलेली आहे. कार्यकारी अभियंता-२ यांना प्रत्येक झोनमधील विहीर, बोअरवेल व तलावाचे पुनर्जीवन, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतींना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक करण्याबाबत सूचना देणे व संबंधिताना याविषयी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शहर अभियंत्यांद्वारा सर्व प्रभाग अभियंत्यांना प्रतिमाह १०० ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे झोन कार्यालयाद्वारा बांधकाम परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे बंधनकारक केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांद्वारा सर्व शाळांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या जनजागृती करण्यासाठी चित्रकला स्पर्धा राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रेरक म्हणून नेमले आहे. शाळा परिसरातील नागरिकांची रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सर्व खासगी व शासकीय शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे जिओ टॅग, फोटो व व्हिडीओ चित्रण मोबार्ईलद्वारे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मागील काळात मरगळ आलेली जलसंधारणाची मोहीम आता गतिमान झाली आहे. लोकसहभागाला आता राजाश्रय मिळाला आहे.
आता ‘जलशक्ती’चे बळ
शहरामध्ये तीन महिन्यांपासून जलसंधारणाची लोकचळवळ सुरू आहे. नागरिकांचा याला सकारात्मक प्रतिसाद आहे. आता जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून ही मोहीम व्यापक करण्यात येऊन सर्व माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येत आहे.
- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका
नागरिकांना जलसंधारणाची जाणीव
शहराचे भूजल पुनर्भरण होणे महत्त्वाचे आहे. यामध्ये माघारलेल्या महापालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात जलसंधारण, श्रमदानाची मोहीम राबविली. आम्हीदेखील जलजागृती करीत आहेत. नागरिकांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे महत्त्व पटले व त्यांच्यात सकारात्मक बदल झालेला आहे.
- एस.एस.देशमुख, सेवानिवृत उपअभियंता (बांधकाम)

Web Title: What does 'Rainwater Harvesting' do on paper?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.