लोकप्रतिनिधींचे हेच का कर्तव्य?

By admin | Published: August 23, 2015 12:27 AM2015-08-23T00:27:29+5:302015-08-23T00:27:29+5:30

अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही.

What is the duty of people's representatives? | लोकप्रतिनिधींचे हेच का कर्तव्य?

लोकप्रतिनिधींचे हेच का कर्तव्य?

Next

गुंडांचा व्हावा सफाया : अचलपुरात रात्री १० वाजतानंतर शुकशुकाट
अमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही.
दरम्यान, चार-पाच दिवसांपासून रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याने शहर रात्री १० वाजतानंतर सामसूम होत आहे.
धागेदोरे कुठपर्यंत?
अमरावती/अचलपूर : रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची हत्या ११ आॅगस्ट रोजी केल्यानंतर तालुका हादरला होता. खुनाला कारणीभूत असलेल्या बारूद गँगचा सफाया आता तरी व्हावा, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. 'लोकमत'ने प्रकरण रेटून धरल्यावर आरोपींचे अटकसत्र सुरू झाले. तथापि, पोलीस खाते, महसूल खाते आणि राजकीय मंडळी या गुंडांचा आपापल्या सोयीनुसार वापर करवून घेत असल्यामुळे लोकभावनेचा हवा तसा आदर करण्यात आला नाही. रेती तस्करांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास त्यांचे धागे कुण्या बड्या लोकप्रतिनिधीपर्यंत जुळलेले आहेत, हे उघड होईल.
कासदपुरा, देवडी, गांधी पूल, चावलमंडी, उपजिल्हा रुग्णालयाजवळील दुकाने एरवी रात्री १२ वाजेपर्यंत उघडी रहात असे. कासदपुऱ्यातील चहापानाची दुकाने रात्री ३ वाजेपर्यंत उघडी रहात होती. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत कासदपुरा गजबजलेला असायचा. आता चित्र बदलले आहे. (प्रतिनिधी)
खासदार अडसूळ यांना आम्ही हत्याकांडाची सर्व माहिती दिली आहे. ते दिल्लीला संसदेत अधिवेशनात व्यस्त आहेत. ते पुढील आठवड्यात बटाऊवाले यांच्या घरी भेट देणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ते याची माहिती वेळोवेळी मागवत आहेत.
- विनय चतूर, शिवसेना शहर प्रमुख
पालकमंत्री पोटे येथे प्रत्यक्ष आले नसले तरी आम्ही या हत्याकांडाची माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आहे.
- अभय माथने, स्थानिक भाजपा नेते.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जात आणि धर्म नसतो. त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देण्यात अर्थ नाही. मात्र अमितच्या हत्या करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे. या हत्येस महसूल विभागाचे काही अधिकारीही कारणीभूत आहे. त्यांचेवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. जनतेने संयम पाळावा.
- बाळासाहेब वानखडे, नगरसेवक.

यात्रा उत्साहात, शांतता कायम
नागपंचमीनिमित्त शुक्रवारी सरायपुऱ्यातील श्रीकृष्ण पुलावर भरलेली यात्रा शांततेत व उत्साहात पार पडली. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, असे पोलीस उपनिरीक्षक अजय आखरे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांची भेट नाही
हत्याकांडाची घटना होऊन १० दिवस उलटून गेलेत. लोकांच्या मनात अमितविषयी हळहळ जाणवतेच आहे. बिहारात शोभावे याप्रमाणे गुंडांनी भरदिवसा एका तरुणाला मारून टाकले. प्रशासनाचा कुठलाही धाक नसल्याचाच तो पुरावा होता. रयतेची अशी दशा होते नि शासनाला विचारपूसही करावीशी वाटत नाही. हीच का लोकशाही? हेच का पालकत्त्व? हेच का शासन, असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. ना. प्रवीण पोटे आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी बटाऊवाले यांच्याकडे अद्यापही भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदारांनी बटाऊवाले यांच्या घरी भेट दिली होती.

Web Title: What is the duty of people's representatives?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.