बाजार समितीच्या २४ कोटींच्या कामांना मुदतवाढ का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:17 PM2018-04-01T23:17:47+5:302018-04-01T23:17:47+5:30
बाजार समितीच्या यार्डातील विविध विकासात्मक कामे, व्यापारी संकुल, टॉयलेट, काँक्रीट प्लॅटफार्म तयार करणे, नाल्यावरील पूल बांधणे, शेड तयार करणे अशा विविध विकासात्मक कामांचे कंत्राट पुणे येथील कंत्राटदाराला देण्यात आले होते.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाजार समितीच्या यार्डातील विविध विकासात्मक कामे, व्यापारी संकुल, टॉयलेट, काँक्रीट प्लॅटफार्म तयार करणे, नाल्यावरील पूल बांधणे, शेड तयार करणे अशा विविध विकासात्मक कामांचे कंत्राट पुणे येथील कंत्राटदाराला देण्यात आले होते. या कामांची २४.१० कोटींची ई-निविदा काढून देण्यात आली होती. परंतु, सदर कामे ही मुदतीत झाली नाहीत. याबाबत कारवाई करण्याऐवजी त्या कंत्राटदाराला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यासंदर्भात संचालक मंडळ विचार करीत असल्याची बाब पुढे आली आहे. या कामांना आणखी मुदतवाढ का, असा प्रश्नही आता चर्चेला जात आहे.
बाजार समितीच्या तत्कालीन सभापतींचा राजीनामा, त्यानंतर समितीवर प्रशासकाची नेमणूक, यानंतरच्या काळात नवीन सभापती, उपसभापतींची निवड आदी कालावधीत कामेच न झाल्याने व कंत्राटदाराने देयकाअभावी कामे अधर्वटच सोडल्याने टेंडरच्या करारनाम्यानुसार या कामांची मुदत आता संपली आहे.
सदर कामांच्या निविदा २०१५ मध्ये काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार कामही सुरू झाले. या कामांची मुदत ही दोन वर्षांची होती. ही मुदत यापूर्वीच संपली आहे. सदर कामे करताना अनेक अडथळे आले असले तर मुदतीत कामे होणे अपेक्षित होते. हे काम मिश्रा असोसिएट पुणे हे करीत आहे. सदर कामे ही फक्त ४० टक्केच पूर्ण झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव भुजंग डोईफोडे यांनी दिली. आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामापोटी कंत्राटदाराला ७ कोटी ३२ लाख रुपयांची देयके देण्यात आली आहेत. नवीन सभापती व उपसभापतींच्या निवडीनंतर आॅगस्ट महिन्यापासून एकही देयक देण्यात आलेले नाही. सदर कंत्राटदाराची २.३३ कोटींची बँक गॅरंटी आहे. ती शनिवारी मिळाल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ विचाराधीन असल्याचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी ‘लोेकमत’ला सांगितले. त्यामुळे कामे केव्हा पुर्ण होणार व नियमात होत नसतील तर पुन्हा मुदतवाढ कशासाठी, हा प्रश्नही पुढे येत आहे.
आवक वाढल्याने रखडली कामे
टेंडर झाले तेव्हा पावसाळा वगळून सदर कामे देण्यात आली. मागील वर्षी धान्याची आवक चांगलीच वाढली होती. बारदान्याअभावी माल यार्डात पडून होता. शेतकºयांच्या मालाला जागा द्यावी लागते. परिणामी जागा उपलब्ध न झाल्याने अनेक कामे झालीच नसल्याचा नवा जावईशोध बाजार समितीने लावला आहे.
टेंडर निघाल्यानंतर अनेक अडचणी आल्या. परंतु, शेतकºयांच्या हितार्थ सदर कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ देण्यासंदर्भात आम्ही विचार करीत आहोत.
- प्रफुल्ल राऊत
सभापती, बाजार समिती, अमरावती.