-तर हॉकर्सना व्यवसायबंदी!

By admin | Published: May 7, 2016 12:38 AM2016-05-07T00:38:50+5:302016-05-07T00:38:50+5:30

महापालिकेद्वारा सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास ठेंगा दाखविणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायच करता येणार नाही, ...

-What the Hoksan businessman! | -तर हॉकर्सना व्यवसायबंदी!

-तर हॉकर्सना व्यवसायबंदी!

Next

बायोमेट्रिकला ठेंगा : दस्तऐवज सादर करण्यासाठी २० मे ची 'डेडलाईन'
प्रदीप भाकरे अमरावती
महापालिकेद्वारा सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास ठेंगा दाखविणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायच करता येणार नाही, असा गंभीर इशाराच महापालिका यंत्रणेने दिला आहे. २० मेपर्यंत फेरीवाल्यांनी संबंधित झोन कार्यालयात दस्ताऐवज जमा करावेत, अन्यथा त्यांना महापालिका क्षेत्रात व्यवसायबंदी घातली जाईल, अशी जाहीर सूचना पालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्यावतीने प्रसृत करण्यात आली आहे.
शहरातील वाढते अतिक्रमण, अनियंत्रित वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी हॉकर्स झोनचा पर्याय सशक्तपणे समोर आला. फेरीवाल्यांचे अतिक्रमण तर शहरवासीयांसाठी डोकेदुखी बनले आहे. या पार्श्वभूमिवर फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा पर्याय समोर आला. त्यानुसार मे.सिमॅक आय.टी. प्रा. लि. अमरावती, या संस्थेला शहरातील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे कंत्राट देण्यात आले आहेत. १५ डिसेंबर २०१५ पासून या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. त्यानुसार ३१ मार्च २०१६ पर्यंत सर्व फेरीवाल्यांनी आपापले दस्तऐवज त्वरित जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला व्यापक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा १५ एप्रिलची 'डेडलाईन' देण्यात आली होती.

महापालिकेची सूचना पायदळी
शहरातील सर्व फेरीवाल्यांनी आपापले दस्तऐवज संबंधित झोन कार्यालयातील कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करावेत. जे फेरीवाले १५ एप्रिलनंतर नियमानुसार दस्तऐवज जमा करणार नाहीत, त्या फेरीवाल्यांना त्यानंतर अवैध घोषित केले जाईल व त्यांना महापालिका क्षेत्रात व्यवसाय करता येणार नाही. तसेच यापुढे सर्वेक्षणास आणि दस्तऐवज जमा करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही शेकडो फेरीवाल्यांनी व्यवसायासंदर्भातील दस्तऐवज झोन कार्यालयात जमा केलेले नाहीत.

कंत्राटदाराने बायोमेट्रिक सर्वेक्षण केले आहे. एकूण फेरीवाल्यांपैकी १७०० जणांनी आवश्यक दस्तऐवज जमा केले, तर अनेकांनी रहिवासी दाखलेच जोडलेले नाहीत. अशांना २० मे ची अंतिम मुदत दिली आहे.
- राजेंद्र दिघडे, अधीक्षक, बाजार परवाना विभाग,मनपा

तारीख पे तारीख
प्रथम ३१ मार्च, त्यानंतर १५ एप्रिल व आता पुन्हा नव्याने २० मे २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी २० मेपर्यंत न चुकता नियमानुसार दस्तऐवज जमा करावेत. ही अंतिम मुदतवाढ आहे. २० मेपर्यंत जे फेरीवाले आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांना यापुढे महापालिका क्षेत्रात व्यवसाय करता येणार नाही.

४०१९ फेरीवाले
सिमॅक आय.टी. प्रा.लि. ने आतापर्यंत केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणामध्ये शहरात ४०१९ फेरीवाले व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी १७०० फेरीवाल्यांनीच आतापर्यंत आवश्यक ती कागदपत्रे झोन कार्यालयात जमा केली आहेत. अनेकांनी रहिवासी दाखला न दिल्याने त्यांच्यावर व्यवसायबंदीची तलवार कोसळू शकते.

Web Title: -What the Hoksan businessman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.