तुमच्या मुली नाचल्या तर चालेल काय?
By Admin | Published: May 13, 2017 12:03 AM2017-05-13T00:03:51+5:302017-05-13T00:03:51+5:30
अमरावतीच्या मातीत "हुक्का संस्कृती"च्या रोपट्यांची रूजू लागलेली मुळे बघून या मातीच्या त्यागतेजाने लुकलुकणाऱ्या इतिहासाची आठवण झाली.
प्रासंगिक
गणेश देशमुख
अमरावतीच्या मातीत "हुक्का संस्कृती"च्या रोपट्यांची रूजू लागलेली मुळे बघून या मातीच्या त्यागतेजाने लुकलुकणाऱ्या इतिहासाची आठवण झाली. कृष्णाची अर्धांगिणी देवी रुक्मिणी, प्रभू रामचंद्रांची आजी इंदुमती, नल राजाची पत्नी दमयंती, अगस्ती ऋषींची भार्या लोपामुद्रा, राजा भगिरथाची आई सुकेशीनी- महाभारतात उल्लेख असलेल्या या प्रथम पाच स्त्रियांचे माहेर असण्याचे सामर्थ्य असलेला हा अमरावती जिल्हा.
आई अंबा आणि माता एकवीरेचे जागृत अस्तित्व याच मातीच्या सक्षम भक्तिरसाचा परिपाक. प्राचीन काळापासून अनेक सिद्ध ऋषी-मुनींच्या वास्तव्याने ही भूमी संस्कारित होत आली आहे. सगुणांची लागण जशी माणसांना तशीच सद्गुणांची लागण येथील वनांनाही झाली होती. चराचरांत समावलेल्या निराकाराच्या अस्तित्वाचे विराट रूप बघू शकणारे प्रज्ञाचक्षु उघडण्यासाठी या भूमीत वर्षानुवर्षे साधना करणाऱ्या ऋषींना मदत व्हावी, अशीच वृक्षे या भूप्रदेशातील अभयारण्यांत उगविली होती. येथे औदुंबरांच्या (उंबर) वृक्षांचे वन होते. ऋषी-मुनींना ज्ञानसाधनेदरम्यान महत्त्वपूर्ण क्रिया असणाऱ्या होमासाठी जी समिधा (होमाग्नीसाठीची लाकडे) आवश्यक असायची ती औदुंबर वृक्षांपासूनच निर्माण होत असे. अमरावतीला पूर्वी उंबराच्या वनांमुळे ऊमरावती आणि ऋषींच्या वास्तव्यामुळे इंद्रपुरीही संबोधले जायचे. समिधेच्या सहज उपलब्धीमुळे ऋषींच्या कित्येक पिढ्यांच्या साधनासिद्धतेतून या प्रदेशातील भूमी, वायू, जल संस्कारभारित होत राहिले. वातावरणात भिनलेल्या याच तपसंस्कारांचा प्रभाव की काय, माणूसपण उन्नत करणारे हे कार्य आतापर्यंत अविरत सुरूच आहे. नाथ संप्रदायातील चौरंगीनाथ, महानुभावपंथीयांचे दैवत श्री चक्रधर स्वामी, प्रज्ञाचक्षू संत गुलाबबाबा, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत अच्च्युत महाराज या व्यक्तिमत्त्वांची कीर्तीकार्ये याच मातीतील.
कृषिक्रांतीचे प्रणेते डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, कुष्ठरोग्यांचे मसिंहा दाजीसाहेब पटवर्धन, ब्रिटिशांना त्यांच्या कायद्यात दोनदा सुधारणा करायला भाग पाडणारे दादासाहेब खापर्डे या सुगंधी वल्लींची जडणघडण याच मातीतील.
भगवान कृष्णाने विदर्भकन्या रुक्मिणीहरणासाठी या भूमित केलेल्या युद्धापासून तर भाऊसाहेब देशमुखांच्या शिक्षणकार्यापर्यंतची सारीच कार्ये मानव कल्याणाच्या संस्कारांना बळकटी देण्यासाठीचीच. कर्तृत्त्वाच्या या भूमितून आजपर्यंत उगवले ते सदाचार, आसमंतात निनादले ते सद्विचार आणि वातावरणात भिनले ते केवळ संस्कार! अंबानगरीचे हे गौरवशाली अस्तित्व टिकविण्यासाठी जुन्यानव्या सर्वच पिढ्या आपापल्या परीने झटल्या आहेत; तथापि या भूमीच्या तपोवलयाशी नाते नसलेल्या आणि संस्कृतीशी नाळ न जुळलेल्या काही धनिकांची व्यावसायिक नजर या अंबानगरीवर पडली. व्यवसाय करणे आणि पैसे कमविणे, इतकाच त्यांचा संकुचित विचार. शक्य त्या सर्व मार्गांनी बक्कळ पैसा ओरबडून झाल्यावर आता पुढे काय, हा प्रश्न त्यांना पडला. त्यांची नजर पडली ती अंबानगरीच्या सुसंस्कारी वातावरणावर. व्यावसायिकच ते- विकणे हाच त्यांचा धंदा. अगदी अंबानगरीचा सुसंस्कृतपणाही का असेना! या तपस्वी भूमीच्या अनेक तुकड्यांचा "धंदा" केल्यावर त्याच मनोवृत्तीतून वऱ्हाडाच्या शालीन संस्कृतीवर नखोरे उमटवायला हे टोळके सरसावले. अविचारांचे मिलन झाले नि "हुक्का कल्चर" जन्माला आले.
विचार करण्याची हीच वेळ
अमरावती : नितीशून्य कृत्ये भयभीत असतात. अमरावतीच्या परिपक्व संस्कृतीचे भय त्या उथळ "हुक्का कल्चर"लाही होतेच. छुपे रस्ते, साऊंडप्रुफ हॉल, ग्राहकांनी इतरत्र पत्ता विचारू नये म्हणून रस्त्यावर पेरलेले छुपे एजंट- असा शक्य तितक्या चोरपावलांनी हा धंदा सुरू केला गेला. अमरावतीच्या चतुर्सिमांवर सहा हुक्का पार्लर दोन वर्षांपासून बहरत आहेत. शेजारच्या इमारतींमधील लोकांनाही लगतच्या हुक्का पार्लरमध्ये नेमके काय घडते, याबाबत माहिती नव्हती. संस्कारपूर्ण वातावरणात वाढलेले जिल्ह््यातील तरुण-तरुणी हुक्का पार्लरचे खात्रिलायक ग्राहक असणार नाहीत, याची जाणीव असल्यामुळे, पार्लर टोळीने हेरली ती उच्चशिक्षणानिमित्त अंबापुरीत आलेली रईसजादी तरुणाई. हुक्का पार्लरमधील एका सांजेचा खर्च हजारोंच्या घरात आहे. असेपर्यंत जवळचा पैसा खर्च करायचा आणि सरला की अनैतिक मार्गाने तो कमवायचा- हे सूत्र एकदा का तरुणाईला अवगत करवून दिले की, लक्षावधी रुपयांची गुंतवणूक कैकपटीने वाढून परतावा मिळण्याचा राजमार्ग खुला!
लाजिरवाणे असे की, ज्यांना त्यांच्या घरात संस्कार हवे आहेत, अशी अमरावतीच्याच भूमितील काही मंडळी या धंदेवाईकांच्या पाठीशी छुपी ताकद उभी करतात. एकच प्रश्न अशांना विचारावासा वाटतो- उद्या तुमच्या मुली अशा तोकड्या कपड्यांत नाचल्या तर तुम्हाला चालेल काय?
विचार करण्याची हीच वेळ आहे. वाचकांशी असलेल्या नात्याला आम्ही जागलो. हुक्का पार्लरच्या सुन्न करणाऱ्या वास्तवाचा शोध घेऊन लोकदरबारात पर्दाफाश केला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अमरावतीचे संस्कृतिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्यांना धडा शिकविला. सर्व हुक्का पार्लरना गुरुवारी तात्पुरता मनाईहुकूम जारी केला. आमदार सुनील देशमुख यांनी शुक्रवारी महापालिकेत या मुद्यावर तातडीची बैठक बोलविली. कामगार अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन अधिकारी आणि महापालिका प्रशासनाचे कान उपटले. बजरंग दलाचे महानगर संयोजक निरंजन दुबे यांनी धमक्या मिळूनही मुद्दा रेटला. तूर्तास असंस्कारांवर संस्कारांचा विजय झाला; पण काम संपलेले नाही. या जिल्ह्यातील सर्वच जबाबदार लोकप्रतिनिधी, संघटना, समाजधुरीण, राजकीय पक्ष, आईबहिणी असल्या वाह््यात व्यवसायांविरुद्ध एकजुटीने आणि स्वयंस्फूर्तपणे उभे ठाकतील तेव्हाच केवळ या भूमित रूजलेल्या संस्कारांचे रक्षण होऊ शकेल. घराघरांतील तरूण-तरूणी उद्याही शालीनच असू शकेल.