आकाशवाणी कार्यक्रमांचा उद्देश काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:24 PM2017-10-31T23:24:03+5:302017-10-31T23:24:32+5:30
येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे.
शिक्षण, माहिती-प्रसारण, प्रबोधन, प्रेरणाकार्य, कला-लोककला, भाषा आदींबाबतचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आकाशवाणी कार्यरत आहे. स्थानिक केंद्रांमधून अशा स्थानिकांना स्थान मिळणे अपेक्षित आहे. परंतु, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे अनेक व्यक्तिमत्त्व आकाशवाणीने दुर्लक्षित केले आहेत.
प्रसारणाची संधी मिळण्यासाठी कुठलीही निश्चित शिस्त आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रात नाही. संबंधितांशी स्वत: संपर्क करुन बायोडेटा मागवून प्रसारणाची संधी दिली जाते, अशी माहिती कार्यक्रम प्रमुख सुनालिनी शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही पद्धती आक्षेपार्ह नसली तरी अनेक प्रतिभावंत आणि कर्मयोगी शर्मा यांच्या यादीत समाविष्ट नसल्यामुळे त्यांच्यात नाखुषीचा सूर आहे.
केंद्र सरकारच्या नभोवाणी मंत्रालयाने आकाशवाणी केंद्राच्या परिसरात अधिकारी, कर्मचाºयांसाठीे स्वतंत्र वसाहत साकारली आहे. नियमानुसार याच वसाहतीत वास्तव्य असावे, असे अपेक्षित आहे. परंतु, काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा करीत असल्याने कार्यक्रमांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होतो. स्थानिक पातळीवर दोन तास कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहेत. त्यातही मराठी भाषेशी दुजाभाव केला जातो, अशी खंत जिल्हाभरातील अनेक मराठीप्रेमींनी व्यक्त केली.
खरे हिरे दुर्लक्षित?
अमरावतीच्या महेंद्र भुतडा आणि अजय दातेराव या समाजकार्याला वाहिलेल्या मित्रांनी रक्तदान चळवळीत देशभरात नवा विक्रम केला. १९७६ पासून रक्तदान करणे आणि त्यासाठी प्रेरित करणे हेच ध्येय बाळगलेल्या या दोघांनी ४५०० रक्तदान शिबिरे आयोजित करून साडेतीन लक्ष युनिट (बॉटल) रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले. हजारोंचे प्राण त्यामुळे वाचू शकले. नि:शुल्क सेवा देणाºया या देवदूतांची दखल राष्ट्रपतींनी घेतली. मात्र, अमरावती आकाशवाणीने त्यांना दुर्लक्षित केले. उदाहरणादाखल भुतडा आणि दातेराव यांचा उल्लेख येथे केला असला तरी अशा अनेक हिºयांची चमक आकाशवाणीला का दिसू नये?
आकाशवाणी प्रसारण केंद्रातून स्थानिक २०० जणांना संधी दिली. त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. एकाच व्यक्तीला वारंवार बोलावून प्रसार, प्रचार केला जात नाही.
- सुनालिनी शर्मा
कार्यक्रम प्रमुख,
आकाशवाणी, अमरावती.