‘त्या’ केंद्राध्यक्षांवर ‘आरओ’ मेहरबान का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:25 PM2019-06-03T23:25:06+5:302019-06-03T23:25:29+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली. तीन वेळा प्रशिक्षण झाल्यानंतरही निष्काळजीपणा करणाऱ्या मतदान केंद्राध्यक्षांवर निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) अद्याप मेहरबान का, असा मतदारांचा सवाल आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी सहा विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार मतदान केंद्रांवर मतदान झाले. सर्व ईव्हीएम अमरावती येथील नेमाणी गोडाऊनमधील स्ट्राँग रूममध्ये त्याच रात्री जमा करण्यात आल्यात व स्ट्राँग रूम सील करण्यात आल्यात. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजता टपाली व साडेआठ वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. अमरावती, तिवसा व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ३२ केंद्रांवरील ३२ ईव्हीएमचे कंट्रोल युनिट (सीयू) हे सुरूच असल्याचे मतमोजणी कर्मचाºयांना यावेळी आढळून आले. वास्तविक, मतदान झाल्यावर क्लोज बटन दाबून युनीट सील करावे लागते. त्यामुळे या सर्व मशीनची मतमोजणी थांबविण्यात आली व आयोगाचे मुख्य निरीक्षक दिनेशकुमार यांच्या परवानगीने संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आटोपल्यानंतर बटन बंद करून मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया काही वेळासाठी खोळंबली. तीन प्रशिक्षणानंतर जर राष्ट्रीय कर्तव्यात चूक होत असेल, तर अशा कर्मचाºयाविरुद्ध आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.
फेरीनिहाय संख्येतदेखील विसंगती
आयोगाने अमरावती येथील मतमोजणी केंद्र आदर्श ठरविले होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत खोळंबा व त्यामुळे सुविधा पोर्टल, आरओंद्वारे ध्वनिक्षेपकावरून जाहीर फेरीचे आकडे व माध्यम कक्षात देण्यात आलेली फेरीनिहाय शीट यामध्ये तफावत दिसून आली. हा घोळ शेवटपर्यत सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ ईव्हीएमच्या आकडेवारीमुळेच हा घोळ झाला व आदर्श मतमोजनी केंद्रात विसंगती दिसून आली.
सर्व ३२ मतदान केंद्राध्यक्षांना बोलावून चूक कशी झाली, याची कारणमीमांसा करणार आहोत. त्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी याबाबतचा निर्णय घेतील.
- शरद पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी