नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाविषयी मुख्यमंत्र्यांचे मौन का? महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:15 PM2018-10-29T20:15:26+5:302018-10-29T20:15:57+5:30
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील ज्येष्ठ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाला पाच वर्षे उलटून गेलेत, सनातनचे कार्यकर्ते अटक केले. मात्र, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांची चुप्पी का?
अमरावती - अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील ज्येष्ठ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाला पाच वर्षे उलटून गेलेत, सनातनचे कार्यकर्ते अटक केले. मात्र, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांची चुप्पी का? त्यामागील कारण काय, असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारिणीने राज्यस्तरीय बैठकीत उपस्थित केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अमरावती शहर शाखा व प्रयास सेवांकूर यांच्या संयुक्त पुढाकाराने २७ व २८ आॅक्टोबर रोजी राजस्तरीय बैठक विमलनगरातील प्रयास येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीचे प्रथमच अमरावतीत आयोजन करण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासोबतच अंनिसच्या पुढील भूमिकेवरील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत राज्याध्यक्ष अविनाश पाटील, महासचिव माधव बावगे, प्रयास सेवांकुरचे संचालक डॉ.अविनाश सावजी, अमरावती शाखेच्या अध्यक्षा स्मिता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत राज्याध्यक्ष पाटील यांनी अंनिसची भूमिका मांडली. महासचिव माधव बावगे यांनी मानसमित्र या विषयावर मत व्यक्त केले. ही बैठक यशस्वीतेकरिता कार्याध्यक्ष अॅड. अमित सहारकर, सचिव वर्षा देशमुख, सुनीता संगेकर, रजनी आमले, प्रवीण गुल्हाने, नचिकेत राठोड, सत्यम वानखडे, सूरज वानखडे, श्वेता भेले, वैभव भेले, धीरज धुर्वे, गौरखेडे, कोहळेंसह अंनिस कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.
बैठकीत तीन विषय चर्चेला
अंनिसच्या राज्यस्तरीय बैठकीत मीटू च्या विषयावर अभिव्यक्ती स्वांतत्राचा विचार करून अंनिसने पाठिंबा दर्शविला. कोणत्याही प्रकारचे सहकार्य, कायदेविषयक मदत, अंधश्रद्धेचा विषय असेल तर तत्काळ दखल घेऊन महिलांना मदत करण्याची भूमिका अंनिसने दर्शविली. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री काहीही बोलायला तयार नाही, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, मुख्यमंत्र्यांनी चुप्पी का साधली? त्यांनी मौन सोडावे, असा प्रश्न अंनिसने बैठकीत उपस्थित केला. शासनाने फटाका फोडणाºयावर निर्बंध आणले. रात्री ८ ते १० पर्यंतच फटाके फोडण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरच्या वेळेत फटाके फोडल्यास शासनाची काय भूमिका राहील, वेळेनंतर फटाके फोडणाºयांवर कारवाई करेल का, याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, या मुद्द्यावरही अंनिसच्या बैठकीत खल झाला.