खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली....?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:44+5:302021-07-17T04:11:44+5:30

शिक्षकांना करावी लागतात शेकडो अशैक्षणिक कामे अमरावती : विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र, गत काही दिवसात ...

What was the teacher's job of cooking khichdi and distributing it to the children? | खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली....?

खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली....?

Next

शिक्षकांना करावी लागतात शेकडो अशैक्षणिक कामे

अमरावती : विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र, गत काही दिवसात विद्यार्थी- शिक्षकांच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. अशातच जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदारीची १०८ अशैक्षणिक कामे देण्यात आली आहे. खिचडी शिजविण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंतच्या कामांचा यात समावेश असल्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी देणे महत्त्वाचे आहे.

कोरोना संकटामुळे दीड वर्षापासून शाळांना सुट्टी आहे. या कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग घेतले जात आहे. मात्र ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क तसेच इतर समस्या असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. काही शिक्षक आपल्या परीने त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष शिकविण्यापेक्षा इतर कामातच अधिक असते. अशावेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे ठरत आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना भरपूर वेतन दिले जाते. कोरोना काळात तर त्यांना कामच नाही. त्यांचे वेतन कमी करायला पाहिजे, असा सूर समाजातील काही वर्गातून उमटत आहे. काही अपवाद वगळता अन्य शिक्षक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र अशैक्षणिक कामामुळे तेही कंत्राळले आहेत. केवळ शैक्षणिकच कामे द्यावी, अशी मागणी सातत्याने शिक्षक संघटनांकडून शासन दरबारी होत आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

बॉक्स

शिक्षण सोडून इतर कामांसाठी प्रत्येक शाळेत एक शिक्षक

जिल्हा परिषद शाळांमध्ये क्लार्क नसतो. प्रत्येक कामे शिक्षकांना करावी लागतात. यात शाळा संदर्भातील ऑनलाईन माहिती भरावी लागते. एका शिक्षकाकडे ही सर्व कामे सोपविली जात आहे. त्यात यु-डायस वर माहिती भरणे, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, ही सर्व कामे त्या शिक्षकांकडून करून घ्यावे लागतात.

बॉक्स

खिचडी शिजवून घेणे व मुलांना वाटप करणे

सध्या शाळा बंद आहेत. मात्र, शाळा सुरू झाल्या की, शाळेमध्ये खिचडी शिजवून मुलांना वितरित करण्याचे कामही शिक्षकांना करावे लागते.

बॉक्स

जिल्हा परिषदेच्या शाळा १५८३

एकूण शिक्षक ५२२५

बॉक्स

शिक्षकांची कामे

मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्याचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यु-डायस वर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्ती बाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, धान्य साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्याना धान्य वितरित करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, कोरोनामुळे रस्त्यावरील नाक्यावर शिक्षकांना तपासणीसाठी कामावर लावण्यात आले होते.

बॉक्स

एकशिक्षकी शाळेचे हाल

ज्या शाळेत केवळ एक शिक्षक आहे. त्या शाळेत तर शिक्षकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांची दमछाक होत आहे. एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तरी शाळा बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे यावरही विचार होणे आवश्यक आहे.

बॉक्स

शिक्षक संघटना म्हणतात?

कोट

शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक कामे ही अवघड जागेच दुखणे होऊन बसले आहे. अनेक न्यायालयीन निर्णयानंतर सुद्धा प्रशासन शिक्षकांना अशैक्षणिक कामाला जुंपून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करित आहे. कोरोना काळात तर कहरच केल्या गेला रेशन दुकानापासून दारू दुकानासमोर शिक्षकांना उभे करून शिक्षकांचे नैतिक अध:पतन करण्यात आले.

- ज्योती उभाड,

समन्वयक, महिला आघाडी,

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

कोट

विविध शैक्षणिक कामांमुळे शिक्षक वैतागले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार योजना देखरेख व नोंदी दैनिक कागदोपत्री माहिती पुरविणे, अहवाल लेखन ऑनलाईन माहिती भरणे, शाळा पोर्टल अशी १०८ प्रकारची कामे शिक्षकांच्या मागे लावून ठेवली आहेत. ही कामे कमी करावीत व यासाठी कामासाठी लिपिक तथा शिपायाची नियुक्ती करावी.

- सुनील कुकडे,

जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ

Web Title: What was the teacher's job of cooking khichdi and distributing it to the children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.