एसटी महामंडळाच्या संपकऱ्यांचे आता पुढे काय होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 05:00 AM2022-04-10T05:00:00+5:302022-04-10T05:00:55+5:30
गत ऑक्टोबर २०२१ पासून अमरावती विभागातील दोन हजार ४०० कर्मचारी संपावर होते. जवळपास साडेपाच महिने संपत चालला. या दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर अजूनही ११५० कर्मचारी संपात सहभागी आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. या भूमिकेवर कर्मचारी ठाम होते. शासनाने या काळात कर्मचाऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेतले. मात्र, विलीनीकरणाशिवाय कामावर येणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहन विभागातील ११५० कर्मचारी संपावर होते. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला निवृत्ती योजना प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युईटी सातवा वेतन आयोगासंदर्भात निर्देश देऊन कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये, असे सूचित केले आहे. २२ एप्रिलपर्यंत कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असेही आदेशित केले आहे. आता कामगार येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गत ऑक्टोबर २०२१ पासून अमरावती विभागातील दोन हजार ४०० कर्मचारी संपावर होते. जवळपास साडेपाच महिने संपत चालला. या दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर अजूनही ११५० कर्मचारी संपात सहभागी आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. या भूमिकेवर कर्मचारी ठाम होते. शासनाने या काळात कर्मचाऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेतले. मात्र, विलीनीकरणाशिवाय कामावर येणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.
११५० कर्मचारी अद्यापही संपात
- विभागातील २४०० पैकी ११५० कर्मचारी अद्याप संपावर आहेत. गुरुवारी मुंबई हायकोर्टाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे सूचित केले आहे. यावर कर्मचारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
५० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस अजूनही बंद
- एस.टी. कर्मचारी संपात सहभागी झाल्यानंतर जवळपास सर्व बसेस बंद झाल्या. मधल्या काळात काही बसेस सुरू झाल्या.
- अशातच संपातील काही चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत. त्याच्या माध्यमातून ५० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस बंद आहेत. सध्या १५० बसेस दररोज धावत आहेत.
निलंबित तरीही परिणाम नाही
संपकरी कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आदेशान्वये मधल्या काळात कारवाई करण्यात आली होती. काहींना बडतर्फ करण्यात आले. काहींना तातडीने निलंबित केले, तर काहींच्या सेवा समाप्त करण्यात आल्यात. मात्र प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईचा कर्मचाऱ्यांवर काहीही परिणाम झाला नाही.
संपकरी आता काय म्हणतात?
हायकोर्टाने एसटी कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र, लेखी स्वरूपात आम्हाला याबाबत माहिती मिळाल्यावर तसेच आमचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ. तूर्तास आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.
- संजय मालवीय, संपकरी
आझाद मैदान मुंबई येथे आमचे सहकारी कर्मचारी आंदोलन करीत आहे. आतापर्यंत आमचे १२४ सहकारी बंधू मरण पावले. याबद्दल शासन काही करणार आहे की नाही? आमच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी याबाबत लेखी पत्र मिळाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ.
- सतीश कडू, कर्मचारी
गुरुवारच्या आदेशाप्रमाणे संपकरी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहावे. लग्नसराईच्या काळात प्रवाशाची गैरसोय होणार नाही, याकडे सहानुभूतीने कर्मचाऱ्यांनी प्रवासी, विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक