सणासुदीच्या दिवसांत भाकरी, रेशन दुकानातून गहू गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:50 IST2024-09-02T11:48:49+5:302024-09-02T11:50:17+5:30
Amravati : अंत्योदयसह प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजीचा सूर

Wheat disappeared from ration shops during the festive season!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सण-उत्सवांच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थीना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप करण्यात आलेले आहे व पुढील तीन महिने पुन्हा ज्वारीचे वाटप होणार आहे. अंत्योदय व प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजी आहे.
आधारभूत किंमत योजनेद्वारे जिल्ह्यात ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे व ही ज्वारी आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय व प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. तसे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारा २५ जून रोजी देण्यात आलेले आहे. त्यामुळे गव्हाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे व त्याऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. तसे पाहता ज्वारी ही काही गोरगरिबांची राहिली नाही. मार्केटमध्ये गव्हापेक्षा ज्वारीला भाव जास्त आहे. मात्र, रेशन धान्यात ज्वारी मिळत नाही. त्यातच सणाच्या दिवशी भाकरी केल्या जात नाहीत.
कोणत्या गटाला किती धान्य मिळते?
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १० किलो ज्वारी, ५ किलो गहू व २० किलो तांदूळ सध्या रेशन मधून दिल्या जात आहे. आता सणउत्सवाचे दिवस असल्याने पूर्वीप्रमाणेच रेशनमधून धान्य देण्याची मागणी आहे.
प्राधान्य गट
या कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रति लाभार्थी १ किलो ज्वारी व ४ किलो तांदूळ रेशन दुकानातून दिले जात आहे. त्यामुळे ज्वारी ऐवजी गव्हाचे वाटप करण्याची लाभार्थ्यांची मागणी आहे.
४.७० लाख रेशन कार्डधारक
अंत्योदयचे १.२८ लाख जिल्ह्यात अंत्योदयचे १,२७,९१४ कार्डधारक आहेत. यामध्ये ४,७६,६९५ युनिटसंख्या आहे. या लाभार्थीना दरमहा ३५ किलो रेशनधान्य मिळते.
प्राधान्य गट ३.६८ लाख जिल्ह्यात प्राधान्य गटात ३,६८,०११ शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये १४,८९,८६० युनिटसंख्या आहे. या लाभार्थीना दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते.
गहू गायब, नुसतीच ज्वारी
यावर्षी शासनाद्वारा भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेशन दुकानातून गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. यामध्ये पुढील तीन महिने ज्वारीचे वाटप होईल.
दिवाळीपर्यंत मिळणार ज्वारी
ऑगस्टमध्ये २७,७९० क्विंटल ज्वारीचे वाटप झाले. यामध्ये अंत्योदय गटात १२,८०७ क्विंटल, तर प्राधान्य गटात १४,९८३ क्चिटल ज्वारीची आवश्यकता आहे. रेशनमध्ये दिवाळीपर्यंत ज्वारीचे वाटप होऊ शकते
"रेशनमधून गहू गायब झालेला नाही तर गव्हाचे वाटप सुरूच आहे व त्यासोबत काही प्रमाणात ज्वारीदेखील दिल्या जात आहे."
- प्रज्वल पाथरे, एडीएसओ, अमरावती
"रेशनमधून गव्हाचे वाटप कायम ठेवण्यात यावे व सोबतच ज्वारी अन् साखरही देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."
- विमलबाई ठाकरे, लाभार्थी
"दुकानात गव्हापेक्षा ज्वारी महाग आहे. ज्वारी आरोग्यासाठी पोषकही आहे. सोबतच सणासुदीसाठी गहूदेखील द्यायला पाहिजे."
- शोभा वानखडे, लाभार्थी