सागवान वृक्षांमध्ये गव्हाची पेरणी; सिपना वन्यजीव विभागातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 07:24 PM2018-12-17T19:24:30+5:302018-12-17T19:25:19+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह क्षेत्रात २५ ते ३० लोकांनी जंगल क्षेत्रात खुलेआम अतिक्रमण केले आहे.

Wheat sowing in teak trees; Events in Sipana Wildlife Division | सागवान वृक्षांमध्ये गव्हाची पेरणी; सिपना वन्यजीव विभागातील घटना

सागवान वृक्षांमध्ये गव्हाची पेरणी; सिपना वन्यजीव विभागातील घटना

Next

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह क्षेत्रात २५ ते ३० लोकांनी जंगल क्षेत्रात खुलेआम अतिक्रमण केले आहे. १२० ते १३५ हून अधिक गोलाईच्या शेकडो सागवान वृक्षांच्या मध्ये या अतिक्रमितांनी वनजमीन साफ करून शेतीयोग्य केली आहे. यात काहींनी अधिका-यांच्या डोळ्यांदेखत गव्हाची पेरणी केली आहे. अगदी राज्य महामार्गाला लागून हे अतिक्रमण आहे.
व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलासमोर राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाला लागून असलेल्या जमिनीवरही हे अतिक्रमण आहे. १० ते १५ वर्षांपासून तेथे जंगल उभे आहे. २० ते ३० वर्षांहून अधिक वयाचे शेकडो सागवान वृक्ष त्या ठिकाणी उभे आहेत. अगदी महिना-दीड महिन्यात हे अतिक्रमण करण्यात आले आहे. 
अतिक्रमणकर्त्यांजवळ जुन्या वन गुन्ह्याचे, अतिक्रमणाचे गुन्हा दाखल असल्याबाबतची कागदपत्रे आहेत. यापूर्वी त्यांनी या वनजमिनी कसल्या आहेत. मात्र, मागील १० ते १५ वर्षांत त्यांनी या जमिनी कसलेल्या नाहीत. या जमिनी मिळाव्यात म्हणून त्यांचे न्यायालयात प्रकरण सुरू आहे. आम्ही या जमिनी कसणारच असे स्पष्ट करीत व्याघ्र प्रकल्प अधिका-यांना त्यांनी सुनावले आहे. 
या अतिक्रमणाच्या अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक माधवराज, सहायक वनसंरक्षक तोरो यांनी घटनास्थळाला पाच दिवसांपूर्वीच भेटी दिल्या आहेत. जवळपास २५ ते ३० लोकांवर नव्याने वनगुन्हे दाखल केले आहेत. तरी त्यांचे अतिक्रमण सुरूच आहे.
अतिक्रमण क्षेत्रातील झाडांची मोजणी करून त्या झाडांवर नंबर टाकले जात आहेत. क्षेत्राची मोजणीही केली जात आहे. या अतिक्रमितांपुढे सिपना वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी हतबल असल्याचे दिसून येत आहे. वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या निवासस्थानापुढेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. 
सेमाडोह क्षेत्रातील अतिक्रमण बघता अतिक्रमितांनी व्याघ्र प्रकल्पाला खुले आव्हानच दिले आहे. आठ दिवसांपूर्वी सेमाडोह येथील कार्यशाळेच्या निमित्ताने आलेल्या वरिष्ठ वनाधिका-यांनीही हे अतिक्रमण बघितले आहे. या नव्याने झालेल्या अतिक्रमणाची मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सर्वदूर चर्चा आहे. यासंदर्भात वनविभागाशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

Web Title: Wheat sowing in teak trees; Events in Sipana Wildlife Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.