आठ दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:42+5:302021-07-29T04:13:42+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णसंख्याही वाढली होती. तेव्हा कोरोना रुग्णांना सेवा देताना रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णसंख्याही वाढली होती. तेव्हा कोरोना रुग्णांना सेवा देताना रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका चालक - मालकांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून दामदुप्पट भावाने पैसे मिळायचे. त्यांच्याकरिता दीड ते दोन वर्षे कोरोनाने रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध करून दिली. मात्र, आता अमरावतीत कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असून, हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. इतर आजारांची रुग्ण संख्याही कमी झाल्याने गत आठ दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली आहेत. साहेब, आठ दिवसांपासून एकही भाडे मिळाले नाही हो, अशी भावना एका रुग्णवाहिका चालकाने व्यक्त केली आहे.
शहरातील रुग्णवाहिका चालक - मालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी ‘लोकमत’ने चर्चा केली असता, कोरोनाकाळात आम्हाला पैसे मिळाले, मोठा रोजगारही मिळाला. आम्ही जीव धोक्यात टाकून चांगली सेवाही दिली. मात्र, आता जिल्ह्यातील रुग्ण कमी झाले असून, इतर रुग्णांमध्येसुद्धा घट झाली आहे. त्यामुळे दिवसभरात एखादे भाडे मिळत असल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून इर्विन चौकात रुग्णवाहिका उभ्या आहेत. कोरोनाची पहिली व दुसरी लाट होती तेव्हा एका दिवसात एका रुग्णवाहिकेला पाच ते सहा भाडी मिळायची. अनेकदा तर रुग्णवाहिका उपलब्धच नसल्याने स्कूलबसमधूनसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सुपरस्पेशालिटीत तसेच इतर ठिकाणी हलविण्यात आले.
मात्र, आता शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली, तर इतर कुठल्याही साथी नाहीत. त्यामुळे आता रोजगार बुडाला असून, शेकडो रुग्णवाहिका चालक - मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बॉक्स:
कोरोनाकाळात मिळाले दामदुप्पट भाव
शहरात लहान-मोठ्या ८५ रुग्णवाहिका आहेत, तर ग्रामीणमध्ये तालुका पातळीवर ८० ते ९० खासगी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. कोरोनाकाळात शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्ण न्यायचा असेल तर पाचशे ते एक हजार रुपये इतके भाडे मिळायचे. मात्र, नागपूरला रुग्ण घेऊन जायचा असेल तर साधे भाडे तीन हजार, तर ऑक्सिजन सिलिंडर लावून साडेतीन ते पाच हजारापर्यंत दर मिळायचा.
मात्र, आता शहरासाठी ३०० रुपये, ऑक्सिजन असेल तर ४०० रुपये, तर नागपूरकरिता ३२०० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत असल्याचे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले.
बॉक्स:
डेथ बॉडी उचलायचे मिळायचे १५०० रुपये
कोरोनाकाळात अनेकांना आपला जीव गमावावा लागला. मात्र, सुपरस्पेशालिटी किंवा मान्यताप्राप्त खासगी कोविड रुग्णालयात रुग्ण दगावला, तर त्याची डेथ बॉडी ही स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याकरिता १५००पासून ते तीन हजारांपर्यंत भाडे मिळायचे. त्यातून अनेकांना रोजगार मिळाला होता.
कोट
कोरोनाकाळात रोज चार ते पाच भाडी मिळायची. पण, आता दिवसभर रुग्णासाठी वाट बघावी लागत आहे. रुग्णवाहिका मालकाला चालकाला रोजगार देणे कठीण झाले आहे. आम्हाला शहराकरिता प्रतिभाडे ५०, तर नागपूरसाठी ३०० वाहन चालविण्याचा रोज मिळत आहे. मात्र, आता तोसुद्धा रोजगार मिळणे कठीण झाले आहे.
प्रशांत उचीतकर, रुग्णवाहिका चालक, अमरावती
कोट
कोरोना काळात पैसे मिळाले तरीही जीव धोक्यात टाकून प्रत्येकाने रुग्णसेवाच दिली. मात्र, आता आठ ते दहा दिवसांपासून रुग्ण कमी झाल्याने प्रत्येकाचा रोजगार हिरावला आहे.
हिमंत उभाड, चांगापूर, रुग्णवाहिका चालक-मालक