चायनीज मांजाची जीवाला ‘सजा’, केव्हा थांबणार ‘कटाप’ची मजा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 08:25 AM2021-06-24T08:25:35+5:302021-06-24T08:25:57+5:30

Amravati news दोन दिवसांपूर्वी एका नवतरुणीचा चायनीज मांजाने बळी घेतला, तर सव्वा वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथील सात वर्षीय चिमुकल्याला याच मांजाने प्राण गमवावा लागला.

When ban Chinese kite thread? when will the fun of ‘death’ stop? | चायनीज मांजाची जीवाला ‘सजा’, केव्हा थांबणार ‘कटाप’ची मजा?

चायनीज मांजाची जीवाला ‘सजा’, केव्हा थांबणार ‘कटाप’ची मजा?

Next
ठळक मुद्देमानव-प्राण्यांच्या गळ्याभोवती फास

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : दोन दिवसांपूर्वी एका नवतरुणीचा चायनीज मांजाने बळी घेतला, तर सव्वा वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथील सात वर्षीय चिमुकल्याला याच मांजाने प्राण गमवावा लागला. चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. वसाडची घटना जशी विस्मृतीत गेली, तशी दिव्याचीही जाणार, हे नक्की. मग प्रश्न उरतो, चायनीज मांजाची जिवाला ‘सजा’ होत असताना, त्याला पतंग लावून उडविणाऱ्यांची ‘कटाप’ची मजा केव्हा थांबणार?

             दिव्या शंकर गवई या तरुणीच्या मृत्यूनंतर शहर पोलिसांनी चार ठिकाणी धाडी घालून ५१ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. यापुढेही कारवाई होईल. मात्र, असे प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. नायलॉन मांजाने अनेक पशूपक्षांचे जीव गेले, मानवही त्याचे बळी ठरले. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणारच नाही, असा वसा घेण्याची व तो न टाकण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा त्या मांजाला माहीत नाही की तो कुणाचा गळा चिरतोय? पतंग उडविणाऱ्याच्या आप्तांचा की एखाद्या आगंतुकाचा?

शहर पोलिसांच्या चार ठिकाणी धाडी

गुन्हे शाखा व पोलीस आयुक्तांच्या पथकातील पोलिसांनी राहुलनगरातील एका दुकानात धाड टाकून ६६० रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी दुकानदार रहमान खान सुभान खान (५४, रा. साबनपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई २१ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास करण्यात आली. उस्माननगर येथून शेख रफीक शेख लाला (४७, रा. नालसाबपुरा) याला ताब्यात घेऊन नायलॉन मांजासह अन्य साहित्य असा एकूण ४० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मसानगंज परिसरातील रहिवासी दीप राकेश साहू (१८) याच्या ताब्यातून ६ हजार ४०० रुपयांचा चायना मांजा जप्त केला आहे.

बडनेऱ्यातही गुन्हा दाखल

बडनेरा : चायना मांजाची विक्री करणाऱ्या राजेश पुंडलिक टरपे (३९, रा. जुनीवस्ती बडनेरा) या दुकानदाराविरुद्ध बडनेरा पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून पर्यावरण सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. भगतसिंग चौकात २२ जून रोजी ही कारवाई पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात एपीआय शुभांगी गुल्हाने, जमादार घनश्याम यादव यांनी केली. मांजाचे एकूण १० नग व चक्री जप्त केल्या. याची किंमत ३६०० रुपये असल्याचे नमूद आहे.

दिव्या मृत्यूप्रकरणात ३०४ दाखल

दिव्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २२ जून रोजी तिचे वडील शंकर गवई यांनी तक्रार नोंदविली होती. २१ जून रोजी समर्पण काॅलनी येथून दुचाकीने जात असताना नायलाॅन मांजा गळ्यात अडकून तिचा गळा चिरला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगोले हे करीत आहेत.

Web Title: When ban Chinese kite thread? when will the fun of ‘death’ stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग