मुलांकडून सन्मानित होताना, ‘गहिवरले आई-बाबा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:17 PM2018-01-14T23:17:51+5:302018-01-14T23:19:29+5:30
आधुनिकेतचा मुलामा चढला. घरातील वेळही कमीच झाला. विचारांची आदान प्रदान अन् संवादही तुटण्याची वेळ आली असतानाच एखादा प्रंसग कायम स्मरणात राहतो.
सुमित हरकुट ।
आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : आधुनिकेतचा मुलामा चढला. घरातील वेळही कमीच झाला. विचारांची आदान प्रदान अन् संवादही तुटण्याची वेळ आली असतानाच एखादा प्रंसग कायम स्मरणात राहतो. असाच एक कार्यक्रम चांदूर बाजार येथे पार पडला. मुलांकडून सामूहिकरीत्या सन्मानित होण्याचा भावनिक आनंद व समाधानाच्या अश्रूंना वाट मोकळी करण्याचा क्षण चांदूर बाजारच्या दोनशेवर पालकांनी अनुभवला. मुलांकडून सन्मानित होताना गहिवरलेल्या आई-बाबांनी आशीर्वाद अन् प्रेमाची बरसात केली. यात पाल्यही न्हाहून निघाले.
आधुनिक जगात स्पर्धेत टिकत असतानाच्या धावपळीस मुलांकडून अनवधानाने माता-पित्याकडे दुर्लक्ष होत. चांदूर बाजाराच्या जिजामाता विद्यालयातील ‘मातृ-पितृ’ पूजन सोहळ्यानिमित्त परंपरांची जपवणूक व मुलांना शिकवण देण्याची संधी पालकांना मिळाली. जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीला तोड नाही. पिता हा घराचा पाया असतो, तर आई ही कळस आहे. एक घरासाठी झिजतो तर दुसरी घराला प्रकाशमान करण्यासाठी झटते. या दोघांच्या उपकाराला जगात तोड नाही. म्हणूनच आई-वडील व गुरूंच्या आशीर्वादाशिवाय प्रगतीचा मार्ग सापडत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. विद्यार्थ्यांच्या मनात आई-वडिलांच्या उपकाराची जाणिव निर्माण व्हावी, या हेतूने शाळेत मातृ-पितृ पूजन करण्याचा सोहळा पाच वर्षांपासून जिजामाता शाळा राबवित आहे. मॉ जिजाऊंनी संस्कारातून शिवाजी महाराज घडविले, तर स्वामी विवेकानंदांनी भाारतीय संस्कार सातासमुद्रापलिकडे नेलेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्य दरवर्षी हा सोहळा संपन्न होतो. यासाठी अमरावती येथील बालसंस्कार विभाग श्री योग वेदांत सेवा समितीचे प्रकाश चव्हाण, भारती मानेकर, अनिल पंजवानी, रणजित देशमुख, धनराज कुकडे हे सहकार्य करतात. या सोहळ्याप्रसंगी अंबादास पांडे, बबन किटुकले, प्राचार्य मलवार, पर्यवेक्षक तायडे आदी मंचावर उपस्थित होते.