अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवडीबाबत मुहूर्त केव्हा?

By गणेश वासनिक | Published: April 20, 2023 06:35 PM2023-04-20T18:35:27+5:302023-04-20T18:35:38+5:30

अडीच महिन्यांपासून शोध समितीचे गठन नाही, प्रभारी कुलगुरूंवर दोन विद्यापीठांच्या कामकाजाचा ताण

When is the appointment of the new vice chancellor in Amravati University? | अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवडीबाबत मुहूर्त केव्हा?

अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवडीबाबत मुहूर्त केव्हा?

googlenewsNext

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू शोध समितीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची प्रक्रिया राजभवन अथवा राज्य शासनाने सुरू केली नाही. तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाला अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असून, नवीन कुलगुरू निवडीबाबत समितीदेखील गठीत होऊ नये, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. काही दिवस कुलगुरू पदांचा कारभार प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडे राजभवनाने सोपविला होता. तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे ४ फेब्रुवारी २०२३ पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सोपविण्याचा निर्णय राजभवनातून घेण्यात आला. हल्ली कुलगुरू डॉ. येवले हे अमरावती आणि संभाजीनगर अशा दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूपदांची जबाबदारी सांभाळत आहेत. अमरावती विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नसल्याने अनेक बाबींवर तोडगा अथवा निर्णय घेताना प्रशासनाला अडचणी येत असल्याचे वास्तव आहे.

समिती गठन झाल्याशिवाय कुलगुरूंची निवड अशक्य
राज्यपालांकडून कुलगुरू निवडीसाठी समिती गठीत झाल्याशिवाय नवीन कुलगुरू मिळत नाही. ही समिती राजभवनातून गठीत केली जाते. अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती, तर सदस्य म्हणून विद्यापीठ प्रतिनिधी, राज्य प्रतिनिधी, प्रधान सचिव अशी चार जणांची समिती असते.

अर्ज मागविण्यासाठी नोडल अधिकारी होते नियुक्त
कुलगुरू पदांसाठी पात्र व्यक्तिंचे ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमधून एक नोडल अधिकारी
नेमला जातो. हा नोडल अधिकारी कुलगुरू पदांसाठी आलेल्या अर्जांची छाननी करणे, अपात्र अर्जदार वगळणे आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी निवड समितीकडे पाठविणे अशी प्रक्रिया राबवितो. निवड समितीने एकूण पाच नावे कुलगुरू पदासाठी पात्र ठरवावी लागतात. ती नावे राजभवनाकडे मुलाखतीसाठी पाठविण्याची कार्यवाही नोडल अधिकाऱ्यांना करावी लागते.

Web Title: When is the appointment of the new vice chancellor in Amravati University?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.