मुख्य सूत्रधाराला अटक केव्हा?
By admin | Published: January 31, 2015 01:01 AM2015-01-31T01:01:42+5:302015-01-31T01:01:42+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा मुख्य सूत्रधार राजेश पडोळे हा तिवसा पोलिसांना गवसलाच नाही. त्याला एक, दोन व्यतिरिक्त कोणी पाहिलेच नसल्याने त्याचा शोध घेऊन अटक करणे तिवसा पोलिसांना आव्हान ठरले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या राजीव गांधी ग्राम विमा योजनेच्या नावे तिवसा तालुक्यामधील किमान १५ ग्रामपंचायतीमधील शेकडो नागरिकांना गंडविण्यात आले. १०० रूपयात १ लाखाची विमा पॉलिसी असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, शासनाची राजमुद्रा अंकित असणारी पावती देण्यात येत असल्याने विश्वास बसला व ईथेच त्यांची फसगत झाली. प्रकरणात भांबोरा ग्रामपंचायतीचा शिपाई गणेश गवळी याला तिवसा पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे याच्या मागावर पोलीस आहे. त्याला फार कमी लोकांनी पाहिले असल्याने व त्याचा पत्तादेखील कुणाला माहीत नसल्याने पोलीस तपासातील अडचणी वाढत आहेत.
दरम्यान शुक्रवारी भांबोरा ग्रामपंचायतीचे सरपंच काळमेघ यांचे तिवसा पोलिसांनी बयाण नोंदविले. तसेच ग्रामसेवक बांते यालादेखील चौकशीसाठी बोलाविण्यात येऊन त्याचे बयाण नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकारी तेलंग यांनी सांगितले. चपराशाने परिपत्रक आणून दिले त्यावरून ठराव घेण्यात आला, असे ग्रामसेवकाने सांगितले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक तेलंग म्हणाले.
शासनाची राजमुद्रा, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्र, ग्रामपंचायतने शासकीय योजना म्हणून ग्रामपंचायतने घेतलेला ठराव, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचाच चपराशी काढत असलेली विमा पॉलिशी यावर विश्वास बसत भांबोरा, अमदाबाद, पालवाडी येथील शेकडो नागरिकांनी अस्तित्वात नसलेल्याच राजीव गांधी ग्राम विमा योजना, जीवनदायी ग्राम विमा योजनेच्या पॉलिसी काढल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)