दारूबंदी जिल्ह्यांमध्ये मंजूर पदभरती केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 05:38 PM2018-10-03T17:38:30+5:302018-10-03T17:39:12+5:30

राज्यात दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, १४ महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्यापही राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील विविध संवर्गातील एकूण ४४ पदे भरण्यात आली नाही.

When the recruitment process is approved in the liquor ban district? | दारूबंदी जिल्ह्यांमध्ये मंजूर पदभरती केव्हा?

दारूबंदी जिल्ह्यांमध्ये मंजूर पदभरती केव्हा?

googlenewsNext

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, १४ महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्यापही राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील विविध संवर्गातील एकूण ४४ पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यांमध्ये मंजूर पदभरती केंव्हा करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


    गृहविभागाने १२ जुलै २०१७ रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची २२ पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. ही पदे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागात समान पदभरतीने भरण्याबाबत निर्णय झाला. तथापि, निर्णय होऊन दुसऱ्या वर्षांकडे वाटचाल सुरू झाली असताना, गृहविभागाने अद्याप ही पदे भरलेली नाही. दारूबंदीच्याच या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्यासंदर्भात पोलीस विभागावर मोठी जबाबदारी आली आहे. दारूबंदीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली नसल्याने सीमेलगतच्या राज्यातून वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात बनावट देशी, विदेशी दारूचा महापूर वाहत आहे. दारूबंदी असूनही जागोजागी दारू सहजतेने उपलब्ध होत आहे. दारूबंदी जिल्ह्यांमध्ये दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पदभरतीबाबत राज्य शासनाने निर्णय घेऊनही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची जागा का भरण्यात आल्या नाहीत? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. 

 

टॉस्क फोर्सचे गठन गुंडाळले
तीनही जिल्ह्यात दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन पदभरती करून स्वतंत्र टॉस्क फोर्स गठित केले जाणार होते. यात पोलीस आणि एक्साईजचे स्वतंत्र पथक नेमले जाणार होते. अपर पोलीस अधीक्षक १, पोलीस निरीक्षक ३, पोलीस उपनिरीक्षक ६, पोलीस शिपाई ८, पोलीस शिपाई चालक ४ अशी पोलीस खात्याद्वारे २२ पदभरतीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तर, राज्य उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक १, निरीक्षक ३, दुय्यम निरीक्षक(गट- ब) ६, जवान ८ आणि जवान (वाहनचालक) ४ अशा एकूण २२  पदभरतीस मान्यता मिळाली होती. मात्र, शासन दिरंगाईमुळे ही पदभरती झाली नसल्याची माहिती आहे.

 

दारुबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात गृहखात्यामार्फत पदभरती झाल्याबाबत अनभिज्ञ आहे. मात्र, मंजूर पद भरतीबाबत आढावा घेऊन तसे शासनाकडे पाठपुरावा करू, 
महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Web Title: When the recruitment process is approved in the liquor ban district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.