स्टंटबाजांना रोखणार केव्हा?

By admin | Published: November 29, 2015 12:52 AM2015-11-29T00:52:23+5:302015-11-29T00:52:23+5:30

दुचाकीस्वाराच्या स्टन्टबाजीमुळे नियंत्रण सुटलेल्या कारने सायकलस्वार चिमुकल्यासह हातगाडीचालकाला उडविले.

When the stunts will stop? | स्टंटबाजांना रोखणार केव्हा?

स्टंटबाजांना रोखणार केव्हा?

Next

अनर्थ टळला : सायकलस्वार चिमुकल्यासह हातगाडी चालक बचावला
अमरावती : दुचाकीस्वाराच्या स्टन्टबाजीमुळे नियंत्रण सुटलेल्या कारने सायकलस्वार चिमुकल्यासह हातगाडीचालकाला उडविले. ही घटना समर्थ हायस्कूलजवळ शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात दोघेही बजावले.
शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीमध्येच स्टन्टबाजी करणारे युवक नियमांचे उल्लंघन करीत सर्रास वेगाने वाहन चालविताना आढळून येत आहेत. त्यातच वर्दळीतून वाहन काढताना आरडाओरड करीत अन्य वाहनधारकांना भयभीतसुध्दा करीत आहेत. अशीच एक घटना शनिवारी दुपारी समर्थ हायस्कूलजवळ घडल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. अज्ञात दुचाकीस्वार राजापेठकडून बडनेराकडे भरधाव जात असताना ते स्टन्टबाजी करीत होते. ते समर्थ हायस्कूलजवळ स्टन्टबाजी करीत असताना अचानक बडनेराकडे जाणाऱ्या कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने त्याच मार्गावरून जाणाऱ्या सायकलस्वार चिमुकल्याला उडवून हातगाडी व रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या एका चारचाकी वाहनावर जाऊन धडकली.

दोघांचा घटनास्थळावरून पोबारा
अमरावती : सुदैवाने या अपघातात सायकलस्वार ओम महेश बुंदेले (रा.नारायणनगर) व हातगाडी चालक रामू जाधव (रा.औरंगपुरा) हे बचावले. या घटनेची माहिती काही नागरिकांनी नियंत्रण कक्षाला देताच काही वेळात सीआरओ मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहचली. मात्र, तोपर्यंत दुचाकीस्वार व कारचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला. राजापेठ पोलीस पुढील कारवाई करीत होते. मात्र, या घटनेमुळे शहरातील स्टन्टबाजी करणाऱ्या युवकाचा प्रताप उघडकीस आला. शहरात दररोज अनेक युवक स्टन्टबाजी करताना आढळून येतात. मात्र, पोलीस विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या घटनेमुळे निदर्शनास येत आहे. स्टन्टबाजी करणाऱ्या युवकावर पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: When the stunts will stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.