परप्रांतीय शीतपेय विक्रेत्यांवर कारवाई केव्हा? एफडीएचे दुर्लक्ष : प्रेमीयुगुलांचा बनला अड्डा
By admin | Published: March 7, 2016 12:06 AM2016-03-07T00:06:32+5:302016-03-07T00:06:32+5:30
उन्हाळा लागल्यामुळे थंडपेयांची मागणी वाढली आहे. उन्हाच्या दाहकतेपासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक शीतपेय पितात. ...
परप्रांतीय शीतपेय विक्रेत्यांवर कारवाई केव्हा?
एफडीएचे दुर्लक्ष : प्रेमीयुगुलांचा बनला अड्डा
संदीप मानकर अमरावती
उन्हाळा लागल्यामुळे थंडपेयांची मागणी वाढली आहे. उन्हाच्या दाहकतेपासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक शीतपेय पितात. परंतु फुटपाथवर विविध शीतपेयांच्या गाड्या लावून व्यवसाय करणारे परप्रांतीय विक्रेते कुठल्याही नियमांचे पालन करीत नाहीत. या शीतपेयांच्या किमतींवरही कोणताच धरबंध नाही. असे असताना या परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे अन्न व प्रशासन विभाग आणि व महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
गाडगेनगर ते व्हीएमव्ही कॉलेज मार्गावर शिवाजी महाविद्यालयासमोर, मालटेकडीचा परिसर, कॅम्प रोड आदी शहराच्या विविध भागांत इतर राज्यांतून आलेल्या शीतपेय विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. हे शीतपेय विक्रेते अन्न व प्रशासन विभागात नोंदणी न करताच सर्रास व्यवसाय करीत आहेत. महापालिकेने लोकांच्या सोयीसाठी लाखोंचा खर्च करून फुटपाथ उभारलेत. पण, अनेक फुटपाथ शीतपेय विक्रेत्यांच्या अतिक्रमणात असलेले दिसतात.
या गाड्यांवर रात्री उशिरापर्यंत तरूण-तरूणी तासन्तास बसून गप्पा मारताना आढळतात. या गाड्यांवर २५ ते ३० रुपयांना मिळणारे शीतपेय चक्क ४० ते ५० रुपयांना विकले जाते. अनेक गाड्यांवर तर तरूण-तरूणींसाठी बसण्याची व्यवस्थासुध्दा करण्यात येते.
अस्वच्छता, दूषित पाण्याचा वापर
ज्यूस सेंटरमध्ये फळांचा रस काढल्यानंतर भांडी स्वच्छ करण्यात येत नाहीत. त्यामुळे नेहमी येथे घाण पसरलेली असते. त्यावर माशा घोंघावत असतात. याठिकाणी पिण्यासाठीदेखील अस्वच्छ पाणी दिले जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात ५० ते ७० शीतपेय व ज्यूस विक्रेते आहेत. याच्यावर अन्न, प्रशासन विभाग कारवाई का करीत नाही, हा प्रश्नच आहे.