तथाकथित बाबा स्वत:ला देव मानतो तेव्हा...; म्हणे स्वतंत्र आरती महिमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:04 PM2023-03-29T15:04:54+5:302023-03-29T15:07:30+5:30

आश्रमातील फलकातून सांगतो महात्म्य; अंधभक्त होऊ लागले डोळस

When the so-called Baba considers himself to be God; Say independent aarti Mahima | तथाकथित बाबा स्वत:ला देव मानतो तेव्हा...; म्हणे स्वतंत्र आरती महिमा

तथाकथित बाबा स्वत:ला देव मानतो तेव्हा...; म्हणे स्वतंत्र आरती महिमा

googlenewsNext

अमरावती : तव्यावर बसून भक्तांना अश्लील आणि अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करणारा तथाकथित गुरुदास बाबाचा व्हिडीओ व्हायरल होताच, मार्डीतून रफूचक्कर झाला असताना, त्याच्या त्या ‘तवा’ प्रयोगातील भंपकपणावर लोक उघडपणे बोलू लागले आहेत. अरे हे तर काहीच नाही, त्याने तर स्वत:च स्वत:ला देवत्व प्राप्त करून दिले आहे. त्याच्या आश्रमातील मोठमोठ्या फलकांतून तो कसा आत्मज्ञानी संत आहे, याचा दाखला मिळतो. कळस म्हणजे, त्याने स्वत:वर आरतीही बनवून घेतली असून, त्यात स्वत:ला चक्क देवच संबोधल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने सुनील कावलकर उर्फ गुरुदास बाबाने मार्डीला रामराम ठोकल्याने गावकरी उघडपणे बोलत असताना अंधभक्तही डोळस होऊ लागले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पोलिस व धर्मदाय आयुक्त यांनी त्याच्या आश्रमाची, देणग्यांची व एकूण व्यवहाराची तपासणी करावी, त्यातून गुरुदासबाबाचे भंपक आणि नौटंकीबाज अतार्किक रूप जनतेसमोर येईल, अशी मार्डीकरांची भावना आहे. स्वत:ला संत गजानन महाराजांच्या जातकुळीतील म्हणेपर्यंत त्याची मजल गेली आहे. तो सामान्यांना ‘उल्लू’ बनवत त्यांना देणगीसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोपही मार्डीकरांनी केला आहे.

आरतीतून आत्मस्तुती तव्याच्या एका कोपऱ्यात अवघे काही सेकंद बसून आपल्यात कधीकधी दैवीशक्ती संचारत असल्याचा भंपक दावा करणारा गुरुदासबाबा पोलिसांना चुकवू लागला आहे. त्यातूनच त्याच्या भंपकपणाची प्रचिती आली आहे. कळस म्हणजे स्वत:ला देव म्हणवून घेणारी आरतीदेखील त्याच्या दरबारात गायली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. ही आरती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. मार्डीसारख्या छोट्याशा खेड्यात विस्तीर्ण जागेत दोन-चार गायींसाठी गोरक्षण चालविणाऱ्या व विशिष्ट दिवशी महाप्रसाद देणाऱ्या गुरुदासबाबाने स्वत:लाच ईश्वर संबोधून संत परंपरेचा अपमान चालविल्याची संतप्त भावना जनमाणसातून व्यक्त केली जात आहे.

जय जय गुरुदास भगवान!

संत गजानन माउली, संत साईबाबा यांच्या प्रमाणेच गुरुदासबाबा भक्तांचे दु:ख हरण्यासाठी अवतरले आहेत, असा दावा गुरुदासबाबाच्या आरतीमध्ये करण्यात आला असून, आरतीत त्याला ‘जय जय गुरुदास भगवान, मार्डी गावी प्रकटला करण्या जनकल्याण’ असे संबोधण्यात आले आहे. आरतीनुसार, मतलबी या जगतामध्ये तूच एक सखा जर आहेेस, तर स्वत: गुरुदासबाबा स्वत:वरील संकट हरण्यासाठी गावाबाहेर का पडला, यातच त्याच्या प्रयोगातील, दैवीशक्तीच्या दाव्यातील फोलपणा दडल्याची बहुसंख्यकांची भावना आहे.

अंधाला दृष्टी आल्याचा दावा

दरोडेखोरांनी मारल्यामुळे जखमी झालेल्या व त्याप्रकरणी पोलिसांना शरण गेलेल्या गुरुदासबाबाच्या कृपेने आंधळ्याला दृष्टी येऊ लागली. पांगळे चालू लागले. रोगी बरे होऊ लागले, लोकांचे व्यसने व दारू सुटू लागली, असा दावा त्याच्या आश्रमातील आत्मस्तुतीपर फलकातून करण्यात आला आहे. त्या दाव्यांची व्हायरल व्हिडीओनंतर खिल्ली उडविली जात असून, म्हणूनच आमचा प्रश्न आहे, जर तू चमत्कारी आहेस, तर पोलिसांना सामोरे का गेला नाहीस, असा लाखमोलाचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याचे उत्तर देण्यासाठी सुनील कावलकर ऊर्फ गुरुदासबाबा मार्डीत केव्हा परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: When the so-called Baba considers himself to be God; Say independent aarti Mahima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.