व्यापाऱ्यांनी पाडला भाव, कारवाई केव्हा ?

By admin | Published: April 26, 2017 12:18 AM2017-04-26T00:18:25+5:302017-04-26T00:18:25+5:30

शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ नाही व केंद्रात पडून असलेली २.३५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार की नाही, ...

When the traders lost their house, when the action was taken? | व्यापाऱ्यांनी पाडला भाव, कारवाई केव्हा ?

व्यापाऱ्यांनी पाडला भाव, कारवाई केव्हा ?

Next

बाजार समित्यांमधील स्थिती : यंदा निम्मी तूर केली व्यापाऱ्यांनी खरेदी
अमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ नाही व केंद्रात पडून असलेली २.३५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार की नाही, याविषयी साशंकता असल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी हमीपेक्षा १००० ते १५०० रूपये क्विंटलनी भाव पाडले आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण शासनाद्वारा दिले आहे. यापेक्षा कमी भाव असल्यास शासन खरेदी करेल असे शासनाचे अभिवचन असताना शासकीय तूर खरेदी केंद्र मुदतवाढीचा निर्णय फिरविला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी षडयंत्र रचून भाव पाडला. शासनाने तूर्तास मार्केट यार्डावरील तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्रांना मुदतवाढ नाकारल्याने घरी असलेल्या तुरीच्या घुगऱ्या कराव्या काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
सहा महिन्यापूर्वी ११ ते १२ हजार रूपये प्रति क्विंटल तुरीचा भाव असताना आता ३५०० रुपयांनी व्यापारी मागणी करीत आहे. केंद्राने तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले,तेही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यावर. सरसगट देशांसाठी नाही, तर तुरीचे अल्प उत्पादन असणाऱ्या देशासाठी आहे. केंद्राने जर शासकीय तूर खरेदी केंद्राला मुदतवाढीची परवानगी नाकारली तर राज्य शासनाने ही तूर खरेदी करावी, असा सूर शेतकऱ्यांचा आहे.
शेतकऱ्यांच्या प्रतिकूल स्थितीत व्यापाऱ्याद्वारा लूट होत असल्याने या व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा करण्यात येणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांद्वारा उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)

टोकन दिलेल्या तुरीची होणार खरेदी
दिलासा : बच्चू कडूंच्या आंदोलनाची धास्ती
चांदूरबाजार: स्थानिक बाजार समितीत आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत टोकन देऊन मोजणीअभावी यार्डात असलेल्या तुरीची मोजणी करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे.
चांदूरबाजार बाजार समितीत डीएमओच्या माध्यमातून १ हजार २२ शेतकऱ्यांची २१ हजार ६१४ क्विंटल तूर २२ एप्रिलपर्यंत खरेदी झाली. १ हजार ८०८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. त्यांच्या २३ हजार २३ पोत्यांची मोजणी करण्यात येणार आहे. कडूंच्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली असून यार्डातील तूर खरेदीचे निर्देश देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

तूर उत्पादकांना ३० कोटींचा चुकारा
परतवाडा : अचलपूर बाजार समितीमध्ये जिल्हा मार्केटिंग विभागाच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यात येत होती. २२ एप्रिलला तूर खरेदी बंदचे आदेश मिळाले होते. यावेळी अचलपूर बाजार समितीमध्ये २ हजार ४०८ शेतकऱ्यांची ५३ हजार ६५७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. ३० मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचा चुकारा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आतापर्यंत १८ कोटी रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण तूर खरेदीच्या चुकाऱ्यापोटी ८२ कोटी रुपये थकबाकी आहेत. आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी तूर खरेदी करावी, अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. याचेवळी त्यांनी पणनमंत्र्यांशी चर्चा केली होती.

केंद्रावर आतापर्यंत ३.५३ लक्ष क्विंटल तूर खरेदी
केंद्र बंद होण्याच्या अंतिम दिनापर्यंत दहाही केंद्रावर १६,८३२ शेतकऱ्यांची ३५२४३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यात चांदूररेल्वे येथे १४०० शेतकऱ्यांची २२१०५, नांदगाव ५१३ शेतकऱ्यांची ९०५७, मोर्शी १५०० शेतकऱ्यांची २९८०८, अमरावती १७१९ शेतकऱ्यांची ४५०७१, धामणगाव १९९८ शेतकऱ्यांची ३२४५८, अचलपूर २४०८ शेतकऱ्यांची ५३६५७, अंजनगाव १२९० शेतकऱ्यांची २९४९८, चांदूरबाजार १०२२ शेतकऱ्यांची २१६१४.४८, दर्यापूर २७४२ शेतकऱ्यांची ६९०२५.५०, वरूड २०६६ शेतकऱ्यांची ३८३९१, धारणी १७४ शेतकऱ्यांची १७४७.६४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.

२.३४ लाख पोते केंद्रावर पडून
केंद्रावर सद्यस्थितीत २ लाख ३४ हजार २९७ पोती तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदूररेल्वे २०००, नांदगाव ८५००, मोर्शी १२०००, अमरावती ३६०००, धामणगाव २०२५०, अचलपूर २५२५८, अंजनगाव २५२५५, चांदूरबाजार २३०२३, दर्यापूर ५१५४१, वरूड २८००० व धारणी केंद्रावर २५०० पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.

१४,५९८ शेतकऱ्यांना दिले टोकन
सर्व केंद्रांवर १४५९८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलेले आहे. यात चांदूररेल्वे ५९, नांदगाव ३००, मोर्शी ६००, अमरावती २६४९, धामणगाव ३४८, अचलपूर २६६३, अंजनगाव १३०८, चांदूरबाजार १८०८, दर्यापूर ३५२१, वरूड ८८७, धारणी ४५५ शेतकऱ्यांना टोकन दिलेले आहेत.

Web Title: When the traders lost their house, when the action was taken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.