विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा केंद्राला मंजुरी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:45+5:302021-05-26T04:13:45+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा (अध्यायन) केंद्राचा प्रस्ताव प्रलंबित असून, तो तात्काळ मार्गी लावण्यात ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा (अध्यायन) केंद्राचा प्रस्ताव प्रलंबित असून, तो तात्काळ मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी कुलगुरू, कुलसचिवांना निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. ग्रामगीता या काव्यातून मराठी, हिंदी भाषांमध्ये रचना मांडली. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार राष्ट्रसंताच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्याकडून ग्रामप्रबोधनातून समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम गौरवास्पद आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार, कार्य समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेचे केंद्र त्वरित सुरू व्हावे, अशी मागणी गवई यांनी केली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने शासनस्तरावर पाठपुरावा करून राष्ट्रसंतांच्या भक्तांना न्याय प्रदान करावा, असे नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रसंताच्या विचारधारेवर शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करण्यात यावेत, अशी मागणीदेखील गवईंनी निवेदनातून केली. यावेळी मनोज भिष्णूरकर, राजकुमार बोके, ऋषीकेश वासनकार आदी उपस्थित होते.
---------------------
‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभाग
राष्ट्रसंताचे सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य देशपातळीवर गौरविले गेले. त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात राष्ट्रसंतांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना अटकही झाली होती. ‘आते है नाथ हमारे’ हे राष्ट्रसंतांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्याचे स्फूर्तिगान ठरले होते. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विविध स्तरांवरील कार्याची नव्या पिढीला माहिती अवगत व्हावी आणि त्यांचे विचार अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यास समाजापर्यंत पोहोचावे, अशी मागणी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.