अचलपूर बाजार समितीच्या सचिवाचे निलंबन केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:03+5:302021-07-02T04:10:03+5:30
नरेंद्र जावरे परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांच्या निलंबनाचा अधिकार संचालक मंडळाला आहे. त्यामुळे ...
नरेंद्र जावरे
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांच्या निलंबनाचा अधिकार संचालक मंडळाला आहे. त्यामुळे स्वतः आरोपी असलेल्या संचालक मंडळाने आरोपी सचिवास चार दिवसानंतरही निलंबित न केल्याने सहकार क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या सरळ सेवा नोकरभरती प्रकरणात २९ जून रोजी सभापती व संचालक मंडळास अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुसरीकडे दोन दिवसांनंतर सचिव पवन सार्वे यांना जामीन मंजूर झाला. नोकरभरती प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आता २६ झाली आहे. नोकरभरती प्रकरण राबविणाऱ्या केएनके कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला व लता बाजपेयी यांना नागपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला होता. बाजार समितीने अधिनस्थ या कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी लावली होती, हे विशेष
बॉक्स
संचालक मंडळांना निलंबनाचा अधिकार
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या निलंबनाचे अधिकार संचालक मंडळाला आहे. त्यामुळे स्वतः आरोपी असलेल्या संचालक मंडळाला अधिनस्थ कर्मचारी असलेल्या आरोपी सचिवास निलंबित करावे लागणार असल्याचे महाराष्ट्रातील बहुदा पहिले उदाहरण ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संचालक मंडळाची बैठक बोलावून त्यात सार्वेच्या निलंबनाचा आदेश होण्याची शक्यता सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली.
बॉक्स
डीडीआरचे पत्र
बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांच्या निलंबनाचे सर्वस्वी अधिकार संचालक मंडळाला आहे. अशा स्थितीत बाजार समितीने ही निलंबन कारवाई न केल्यास कारवाई करण्यासंदर्भात बाजार समितीला पत्र देणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोट
सचिवाच्या निलंबनाचे अधिकार बाजार समितीला आहे. त्यावरही निलंबन न केल्यास अधिकाराचे वापर करून पत्र दिले जाणार आहे.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती