आशांना कधी मिळणार कामाचा मोबदला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:12 PM2024-04-27T13:12:01+5:302024-04-27T13:13:34+5:30
Lok Sabha Election 2024 : निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक सहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे: लोकसभा निवडणुकीत आजच्या मतदानाच्या वेळी आशा वर्कर्सनी दिवसभर मतदान केंद्रांवर काम केले असताना या आशांना निवडणूक कामाचा मोबदला मिळालेला नाही. जिल्ह्यातील दीड हजार आशा वर्कर्समध्ये यामुळे असंतोष पसरला आहे
अमरावती व वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ग्रामीण भागातील या मतदान केंद्रावर आवश्यक मदतीसाठी आशा वर्कर्सची नेमणूक करण्यात आली होती. आशा वर्कर्सनी तापत्या उन्हात कामे केली. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात घेऊन जाणे, गर्भवती महिला मतदारांना मतदान केंद्रात नेण्यासाठी या आशांनी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे, तर कडेवर लहान मूल घेऊन आलेल्या महिला मतदारांच्या जवळील या मुलांचा काही वेळ सांभाळ केला.
एकीकडे मतदान केंद्रावर काम करणाऱ्या कोतवाल तसेच शिपायाला निवडणुकीचा भत्ता देण्यात येतो. निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा, असे शासनादेशात नमूद असताना जिल्ह्यातील दीड हजार आशा वर्कर्सना निवडणुकीचा कामाचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. किमान केलेल्या कामाचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे.
दर निवडणुकीत आम्ही इमाने-इतबारे कामे करतो. मात्र, आम्हाला कोणतेही मानधन तथा मोबदला देण्यात येत नाही. निवडणूक विभागाने आमचा सकारात्मक विचार करावा.
- शुभांगी चौधरी, माजी तालुकाध्यक्ष, आयटक (धामणगाव रेल्वे)