किती जणांना होऊन गेला कोराना हे सांगणारा 'सेरो सर्व्हे' करणार केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:54+5:30
कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव मार्ग हा ‘सेरो’ सर्व्हेक्षण आहे. जी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत तेथे हे सर्व्हेक्षण करण्यात यावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक महापालिका प्रशासनही सकारात्मक आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संक्रमण होऊ गेलेल्यांची, कारोना लढासाठीच्या अँटिबॉडिज् त्यांच्या शरीरात उपलब्ध असल्याची ओळख पटविणारी सेरोलॉजिकल चाचणी करणारे सर्व्हेक्षण अमरावती जिल्ह्यात शासनाच्या आदेशानंतर महिना उलटूनही करण्यात आलेले नाही. जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही ढिलाईयुरू आहे.
आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांनी हे सर्वेक्षण करण्याचे आदेश १० ऑगस्टला दिले आहेत. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात पाच हजारांवर कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठीच्या अॅन्टीबॉडी (प्रतिपिंड) किती नागरिकांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, याचा कुठलाही डेटा जिल्ह्यात उपलब्ध नाही.
कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव मार्ग हा ‘सेरो’ सर्व्हेक्षण आहे. जी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत तेथे हे सर्व्हेक्षण करण्यात यावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक महापालिका प्रशासनही सकारात्मक आहे. किती नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता हे समजल्यास प्रशासनालाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करणे सोईचे होणार आहे. जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतरच्या पाच महिन्यात कोरोना संक्रमितांची संख्या ग्रामीणमध्ये साधारणपणे २५०० तर महापालिका क्षेत्रात ५,००० च्या वर नोंद झालेली आहे. संसर्ग झाल्यानंतरच्या १५ दिवसानंतर या आजाराच्या ‘आयजीएम व आयजीजी’ अॅन्टीबॉडीज संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार होतात. संसर्गातून बरे झाल्यानंतरही बरेच महिने त्या टिकू शकतात. या चाचण्या करुन एसएआरएस- सीओव्ही-२ चा संसर्ग होऊन गेलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण समजण्यासाठी ‘सेरो’ सर्व्हे ही चाचणी महत्वाची ठरणार आहे.
शहरात ०.६२ नागरिकांना संसर्ग
महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ८ लाख आहे. या परिस्थितीत ५ हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे व ही संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनूसार शहरातील संसर्गाचे प्रमाण हे ०.६२ टक्के आहे. या पेक्षा कमी प्रमाण असणाºया शहरात ‘सेरो’ सर्व्हे झालेला असतांना अमरावतीमध्ये रखडलेला आहे.
काय आहे सेरोलॉजिकल सर्व्हे
एखाद्या विशिष्ठ कारणांसाठी अनेकांची रक्त तपासणी केली जाते. त्याला ‘सेरोलॉजिकल सर्व्हे’ असे वैद्यकशास्त्रात म्हटल्या जाते. या तपासणीद्वारे रक्तात काही आजाराचे प्रतिपिंड (अॅन्टीबॉडी) तयार झालेले आहेत का, याविषयीचे पृथक्करण केल्या जाते. त्या व्यक्तीच्या श्रिरातील प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करुन आजारास सामोरे जाण्याच्या प्रतिकार शक्तीचे अनुमान बांधल्या जातात व यावर संसर्गाचे प्रमाणाचाही अंदाज येतो. यासाठी हे सर्वेक्षण आवश्यक आहे.
‘सेरो’ सर्व्हेक्षण कशासाठी?
उच्च जोखीम असलेल्या आरोग्य सेवा कर्मचारी, कामगार, इम्युनो कॉप्रोमाईज्ड व्यक्ती, कंटेनमेंट झोनमधील व्यक्ती संक्रमित झाल्या होत्या काय, हे सर्व्हेक्षणातून स्पष्ट होते. यासोबतच प्रत्येक वॉर्डात रॅण्डम पद्धतीने नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करुन त्यांच्यामध्ये अॅन्टीबॉडी तयार झालेल्या आहेत का, शहरात हर्ड इम्युनिटी (सामुहिक प्रतिकारक शक्ती) याची माहिती होऊन उपाययोजनांची दिशा ठरविली जाते.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्व्हेक्षण करता येणार नाही. मात्र, काही प्रमाणात कमी आल्यानंतर सेरो सर्व्हेक्षण केल्या जाईल.
शैलेश नवाल
जिल्हाधिकारी
‘सेरो’ सर्व्हेसाठी कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक पाहिजे. यामध्ये प्रत्येक चाचणीला ६०० रुपये खर्च येईल. तो कोण करणार, आम्ही सहकार्य करायला तयार आहे.
डॉ अनिल रोहनकर
जिल्हाध्यक्ष, आयएमए.
जिल्ह्यात ‘सेरो’ सर्व्हेक्षण करण्यासंदर्भात शासनाच्या अद्याप सुचना नाहीत. यासंदर्भात काय निकष आहेत. याची आपनास माहिती नाही.
श्यामसुंदर निकम.
जिल्हा शल्य चिकित्सक