सहआयुक्त केव्हा करणार गुटखा विक्रेत्यांवर कारवाई ?
By admin | Published: February 8, 2017 12:25 AM2017-02-08T00:25:38+5:302017-02-08T00:25:38+5:30
अंबानगरीत मोठ्या प्रमाणात पुन्हा खुलेआम गुटखा विक्री होत आहे.
अन्न औषधी विभागाची उदासीनता : पानटपऱ्यांवर खुलेआम विक्री
अमरावती : अंबानगरीत मोठ्या प्रमाणात पुन्हा खुलेआम गुटखा विक्री होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व प्रशासन विभागाच्यावतीने कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत. सह आयुक्त आता तुम्हीच कारवाई करा, असे मत अमरावतीकरांनी व्यक्त केले आहे. अमरावतीत विविध चौकात हजारो पाणटपऱ्या आहेत. या पाणटपऱ्यांवर सहज गुटखा उपलब्ध होतो. गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ खाल्ल्याने तरुणांना मोठ्या प्रमाणात आजार बळावत आहेत. त्यामुळे शासनाने राज्यात काही वर्र्षींपुर्वी अधिकृतरीत्या गुटखाबंदी केली आहे. परंतु सर्वत्र अन्न व सुरक्षा मानदे कायद्यांची अन्न व प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळेच पायमल्ली होत असुन खुलेआम गुटखा विक्री होत असताना कारवाया मात्र थंडावल्या आहेत. अन्न व प्रशासन विभाग नुसत्या कागदी घोडे नाचविण्याकरीताच आहेत की, काय, असा सवाल नागरिकांचा आहे. राज्यात गुटखाबंदी लागू असताना अंबानगरीत गुटखा येतोच कसा, हा प्रश्न पडला आहे. येथील बडनेरा येथे काही गोदाम आहेत. त्या गोदामात अवैध गुटखासाठा मध्यप्रदेशातुन येऊन उतरतो. येथुन काही ठोक विक्रेत्यांना व तेथून अनेक किरकोळ गुटखा विक्रेत्यांना गुटखा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. गेल्या तीन महिन्यात अन्न व प्रशासन विभागाने बोटावर मोजण्याइतक्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांना एफडीएच्या आधिकाऱ्यांची धास्ती राहिली नाही. पूर्वी २ रुपयांत मिळणारी गुटखा पुडी आता ५ रुपयांना विक्री होत आहे. सुंगधी तंबाखू पूर्वी तीन ते चार रुपयांना मिळत होते. आत ते १० ते १५ रुपयांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे पाणटपरीवाले गुटखा विक्रेते नागरिकांची लूट करीत आहेत. अन्न व प्रशासन विभागाचे सह आयुक्त केकरे यांनी कारवार्इंचा बडगा उगारल्यास सत्य बाहेर निघेल. (प्रतिनिधी)
एफडीएची तयारी नसल्यास
महसूल विभागाने कारवाई करावी
काही महिन्यांपूर्वी एफडीएच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नव्हती. अंबानगरीत खुलेआम गुटखा विक्री सुरू होती. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्वता पुढाकार घेऊन गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून मोठा गुटखा साठा जप्त केला होता. त्यामुळे गुटखा विक्रेते प्रचंड धास्तावले होते. आता पुन्हा जिल्ह्यात गुटखा विक्रीचा व्यवसाय फोफावला असून अन्न व प्रशासन विभाग कारवाई करीत नसेल तर खुद्द जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाला आदेश देऊन गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गुटखाविक्रेत्यांना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात येणार आहे. कुठेकुठे गुटख्याचा मोठा साठा उतरतो, त्याची माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
एस.आर. केकरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग अमरावती