निराधारांना एक हजाराची मदत मिळणार केव्हा? शासनाची घोषणा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:45+5:302021-05-12T04:13:45+5:30
एप्रिल, मे महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. या ...
एप्रिल, मे महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. या परिस्थितीत निराधारांना कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची स्थिती निर्माण होऊ नये, याकरिता १ हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊन सुरू झाला. मात्र, अतिरिक्त एक हजार रुपये निराधारांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत.
राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेसह इतर विविध योजनांतील लाभार्थ्यांना लॉकडाऊनमुळे एक हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते; परंतु जिल्ह्यात लाभार्थी आजही या लाभापासून वंचित आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेसह इतर विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील ३ लाख २२ हजार १० लाभार्थ्यांना मिळतो; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लागू असलेल्या संचारबंदी काळातही अतिरिक्त एक हजार रुपये अद्याप मिळालेले नाही. मात्र, एप्रिल आणि मे महिन्याचे नियमित अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते केले आहे. कोरोनामुळे हाताला काम नसल्याने शेतातून उत्पादन मिळत नसल्याने या निराधारांवर उपासमारीची वेळ येत आहे. शासनाने एक हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यामुळे निराधारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु हे अनुदानही अद्याप अप्राप्त आहे. अनेक लाभार्थी आपल्या बँकेत अनुदानासाठी चकरा मारत आहेत; परंतु आज-उद्या हे उत्तर ऐकून निराधारांना घराकडे परतावे लागत आहे.
बॉक्स
संजय गांधी निराधार योजना- ६८००७
श्रावणबाळ निराधार- १८८७९३
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना- ६२६४६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना- २१०८
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना- ४५६
बॉक्स
गतवर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला आहे. दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, दैनंदिन शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. याला आवर घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांना धडकी भरत आहे.
कोट
निराधारांना शासकीय योजनेचे एप्रिल व मे महिन्याचे मानधन खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, अतिरिक्त १ हजार रुपयांचे अनुदान अप्राप्त आहे. अनुदान आल्यानंतर वाटप केले जाईल.
- आर.एस. वानखडे,
नायब तहसीलदार
संजय गांधी निराधार योजना विभाग
कोट
लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या मदतीचा हातभार आम्हाला काही प्रमाणात लागला असला तरी आम्हाला अद्याप अतिरिक्त मदत मिळाली नाही.
- सुभद्रा मानकर,
कोट
आम्हाला मंजूर असलेले मानधन वेळेत मिळत नाही. मानधन वेळेत मिळत नसल्याने उदरनिर्वाहाच्या समस्येला सामोरे जावे लागतात. शासनाने जाहीर केल्यावर तात्काळ मदत व्हायला हवी.
- मनकर्णा ठवकर,
शासकीय योजनेचा आधार असला तरी मानधन वेळेवर मिळत नाही. त्यात शासनाने लॉकडाऊनमध्ये जाहीर केलेली मदत मिळाली नाही. ही मदत तातडीने वाटप करून न्याय द्यावा.
- लाडकू सहारे,
कोट
कोरोनामुळे वयोवृद्धांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. उतरत्या वयात या अनुदानावर कामे भागवावी लागत आहेत. त्यामुळे अनुदान दरमहा १ तारखेला मिळावे, अशी अपेक्षा आहे.
- धनराज राऊत,
कोट
शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. सध्या एप्रिल, मे महिन्याचे अनुदान जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अतिरक्त घोषित केल्याप्रमाणे एक हजार रुपयांचे मानधन अजून तरी मिळाले नाही.
- भारत मानकर,