पोलिसांचे घर कधी सजणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:00 PM2017-12-26T23:00:47+5:302017-12-26T23:02:24+5:30
गोपाल डाहाके ।
आॅनलाईन लोकमत
मोर्शी : ब्रिटिशकाळात निर्मित मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अनेक वर्षांपासून डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आली नाही. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा भाड्याच्या घरात राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, पोलिसांच्या मालकीची १२ एकर जागा बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.
मोर्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाच्या बाबतीत दूरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पोलिसांच्या सदनिकेची डागडुजी केली नाही. सदनिकांवरील कवेलू फुटले आहेत. पावसाळ्यात छप्परावर ताडपत्री टाकून पाण्यापासून बचाव करावे लागतात. नाल्या तुंबणे, भिंतीचे प्लास्टर खराब यासह अनेक समस्या कायम आहेत.
ठाणेदारांच्या निवासस्थानाची व्यवस्था खराब झाली आहे. घराचे दरवाजेसुद्धा पूर्णपणे बंद होत नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची स्थिती त्याहीपेक्षा बिकट झालेली आहे. तसेच मोर्शी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हिवरखेड व मोर्शी भाग अतिसंवेदनशील आहे. येथे अनुचित प्रकार घडल्यास पोलीस कर्मचार्यांना तत्काळ बंदोबस्तासाठी जावे लागते. मात्र, अनेक पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात भाड्याने राहत असल्यामुळे त्यांना तैनात होण्यास उशीर होतो.
नव्या घराची प्रतीक्षा
मोर्शी ठाण्यातील एक पीआय, चार एपीआय, आठ महिला पोलीस कर्मचारी व ५२ पुरुष कर्मचारी आहेत. गृहविभागाने मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांसाठी नवीन घरे निर्माण करावी, अशी मागणी पोलीस कर्मचारी वर्तुळातून होत आहे.
भाड्यापोटी लाखोंचा खर्च
मोर्शी पोलीस ठाण्याच्या आवारात बहुमजली पोलीस निवासस्थान तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यासाठी निवासस्थाने निर्माण होणे गरजेचे आहे. मोर्शी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होऊन जवळपास १५ ते १७ वर्षे झाले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारीसुद्धा भाड्याच्या घरात राहत आहेत. या भाड्यापोटी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत.