जिल्ह्यातील डाक सेवकांना कधी मिळणार लस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:10+5:302021-05-23T04:12:10+5:30
मोहन राऊत धामणगाव रेल्वे : प्रत्येक घरी मनीऑर्डर, स्पीड पोस्टची पत्रे, पेन्शनधारकांना रक्कम घरोघरी पोहोचून देणाऱ्या जिल्ह्यातील ...
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : प्रत्येक घरी मनीऑर्डर, स्पीड पोस्टची पत्रे, पेन्शनधारकांना रक्कम घरोघरी पोहोचून देणाऱ्या जिल्ह्यातील ७५० डाक सेवक व याच संख्येतील पोस्ट कर्मचारी अद्यापही कोरोना लसीपासून वंचित आहेत. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक डाक सेवकांना कोरोनाची लागण झाली, तर तिघांचा मृत्यू झाला आहे.
शहर व ग्रामीण भागात टपाल कर्मचारी तसेच डाक सेवक कोरोना काळातही इमानेइतबारे सेवा देत आहेत. १५ ते २० वर्षे या सेवेत दिल्यानंतरही या डाक सेवकांना कोरोनाची प्रतिबंधक लस मिळाली नाही. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेले हे टपाल कर्मचारी वारंवार जनतेच्या संपर्कात येत असल्याने त्यांना त्वरित कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने राज्याला दिले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी राज्यात कुठेही होत नाही. डाक सेवक यांना केंद्र शासनाच्या निर्धारित वेतनापेक्षा अधिक सोयी सवलती मिळत नाही. त्यामुळे स्वतःच्या खिशातील रक्कम त्यांना मेडिकलसाठी खर्च करावे लागतात.
कोट
एप्रिल महिन्यात तीन डाक सेवकांचा कोरोनाने मृत्यू झाला. आम्ही प्रत्येकांच्या संपर्कात येतो. केंद्र सरकारने आम्हाला लस द्यावी, म्हणून राज्याला निर्देश दिले. जिल्हा प्रशासनाला आम्ही पत्र देऊनही आतापर्यंत लस मिळाली नाही.
- पी. एच. जयस्वाल,
प्रदेश सचिव, ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन