वॅगन कारखान्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला गती केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:50+5:302021-04-24T04:12:50+5:30
बडनेरा : दोन वर्षांपासून पाचबंगला परिसरातील नागरिक व याच रस्त्यावरून बऱ्याच गावांकडे जाणारे वाहनचालक कच्च्या रस्त्यामुळे त्रस्त आहे. ...
बडनेरा : दोन वर्षांपासून पाचबंगला परिसरातील नागरिक व याच रस्त्यावरून बऱ्याच गावांकडे जाणारे वाहनचालक कच्च्या रस्त्यामुळे त्रस्त आहे. रस्त्याला गती केव्हा मिळणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
वॅगन कारखान्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. पाचबंगला परिसरातूनच कारखान्याकडे जाणारा रस्ता आहे. शेकडो जडवाहनांमुळे हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र वैगन कारखान्याकडे जाणाऱ्या जडवाहनांमुळे पुन्हा हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच खड्डेमय होईल. शासनाचा लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरेल. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे. अवघ्या एक किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी इतका कालावधी का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे, असेही बोलले जात आहे. पाचबंगला परिसरातील लोक या खराब रस्त्यामुळे प्रचंड त्रस्त आहेत. त्यांनी दोन वर्षांत पक्का रस्ता व्हावा, यासाठी आंदोलने केली. एक किलोमीटर अंतराच्या खडीकरणासाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. प्रत्यक्षात मात्र येथे पक्का काँक्रीटीकरणाचा रस्ता तयार झाला पाहिजे, अशी मागणी होत आहे.