रस्ते केव्हा घेणार मोकळा श्वास?
By admin | Published: January 19, 2015 11:56 PM2015-01-19T23:56:20+5:302015-01-19T23:56:20+5:30
अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.
अमरावती : अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील एकच नव्हे तर तीन संकुलांच्या लिजची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाकडून ते हटविण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टांगा पडाव ते वलगाव मार्ग, बापट चौक ते तहसील तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यालगतच्या लिज संपलेल्या संकुलांमुळे वाहतूक विस्कळीत होते. पादचाऱ्यांनाही त्रास होतो. या तीनही संकुलांचे लीज काही वर्षांपूर्वीच संपले असून संकुलातील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करुन राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे.
टांगा पाडाव ते वलगाव मार्गावर दर ५ ते १० मिनिटांनी ‘ट्रॅफीक जाम’ होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. असे असताना रस्त्यालगतचे अतिक्रमीत संकुल का हटविले जात नाही? याची कारणमिमांसा केल्यास बरेच गौडबंगाल उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर काही जणांना व्यवसाय करता यावा, यासाठी त्यावेळी जिल्हा प्रशासनाने लिजवर जागा दिल्या होत्या. नाममात्र भाडे घेऊन व्यावसायिकांना जागा देण्यामागे प्रशासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, लिजच्या जागेवर असलेले हे अतिक्रमित संकुल आजमितीस अपघातासाठी कारणीभूत ठरु लागले आहेत. ज्यांनी नाममात्र भाडे देऊन जागा वापरली, ते कोट्यधीश झाले. परंतु लीज संपल्यानंतरही प्रशासनाला जागा परत देण्याची त्यांची मानसिकता नाही. महानगरातील प्रमुख मार्गावर हे तीन संकुल असून त्यांचे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे. परकोट भिंतीच्या बाजूला असलेल्या या अतिक्रमीत संकुलांमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. बापट चौक ते तहसील मार्गावरील संकुलांची हिच परिस्थिती आहे.