युरियाची लिकिंग, शेतकऱ्यांच्या मुळावर, कृषी विभाग कधी देणार लक्ष?
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 5, 2023 05:40 PM2023-08-05T17:40:48+5:302023-08-05T17:41:20+5:30
कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
अमरावती - ऐन हंगामात पीक वाढीच्या काळात जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे. युरियाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांद्वारा कॉम्प्लेक्स खतांचे लिंकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रेत्यांद्वारा नको असलेले खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
जिल्ह्यात जून व जुलै महिन्यासाठी मंजूर आवंटनाचे तुलनेत युरियाचा पुरवठा जिल्ह्यास कमी झालेला आहे. सर्वात स्वस्त २६६ रुपये प्रति बॅग असलेल्या या रासायनिक खताच्या वापराकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या सर्वच पिके वाढीवर आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी युरियाची मात्रा देतो. याशिवाय सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली असल्याने युरिया पोषक आहे. मात्र अशा वेळी जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे.