अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू केव्हा? नऊ महिन्यांपासून प्रभारी ‘राज’
By गणेश वासनिक | Published: October 3, 2023 05:27 PM2023-10-03T17:27:02+5:302023-10-03T17:27:48+5:30
निवड समितीचे कामकाज कासवगतीने; अर्ज मागविण्यासाठी जाहिरातीचा पत्ता नाही, शैक्षणिक- भौतिक विकासावर परिणाम
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाला नऊ महिन्यानंतरही कायमस्वरूपी कुलगुरू मिळाले नाही. त्यामुळे कारभार प्रभारी सुरू असून विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र या बाबीकडे पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.
तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे गंभीर आजाराने २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून अमरावती विद्यापीठाचा प्रभारी कारभार सुरु आहे. हल्ली नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सांभाळत आहे. मात्र, नांदेड ते अमरावती असा सुमारे ५०० किमी. चा पल्ला गाठून कारभार हाताळणे डॉ. येवले यांना आता शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे व्यवस्थापन परिषदेने नव्या कुलगुरू निवडीप्रक्रियेसंदर्भात समिती गठीत केली आहे. मात्र या समितीचे कामकाज फारच संथगतीने सुरु आहे. त्यामुळे यंदा तरी अमरावती विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणार नाही, असे संकेत आहेत. विद्यापीठाशी सुमारे ४२५ संलग्नित महाविद्यालये आहेत. नऊ महिन्यांपासून कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने विद्यापीठासह महाविद्यालयांच्या विकासासाठी ही बाब मारक ठरणारी आहे. विद्यापीठाचे घसरलेले ‘नॅक’ कसे सुधारणार अशा अनेक विषयांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तीन महिन्यापासून जाहिरात प्रसिद्ध नाही
नवीन कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी समिती गठीत होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. नवीन कुलगुरू पदासाठी अर्ज मागविणे, जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्जाची छाननी करणे, उमेदवारांच्या मुलाखती घेणे त्यानंतर पात्र पाच उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठविणे आदी प्रक्रिया या समितीलाच कराव्या लागते. साधारणत: या बाबीसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नोडल अधिकाऱ्यांची अगोदरच निवड झाली. पण आता ऑक्टोबर उजाडल्यानंतरही नवीन कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने एकूणच प्रक्रिया ठप्प आहे.